गंगापूर / संभाजीनगर – अमृतवाहिनी प्रवरातिरी असलेल्या खंडोबादेवाची सासुरवाडी नेवासा बुद्रुक येथील खंडोबा- म्हाळसादेवी,सच्चिदानंद बाबा व नारदमुनी या नव्या मंदिरासह पुरातन मंदिरामध्ये चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्ताने दिवसभरात एक लाख भाविकांनी दर्शन घेतले.यावेळी “येळकोट येळकोट जय मल्हार” च्या जयघोषाने म्हाळसानगरी दुमदुमली होती.चंपाषष्ठी निमित्ताने नेवासा बुद्रुक येथील खंडोबा म्हाळसा मंदिर प्रांगणात यात्रा भरली होती.
चं
पाषष्ठी उत्सवाच्या निमित्ताने नेवासा बुद्रुक येथील पुरातन खंडोबा मंदिरात उत्सव मूर्तीस अभिषेक घालण्यात आला.त्यानंतर युवकांनी जेजुरीहुन पायी चालत आणलेल्या ज्योतीचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले.यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे महंत हभप श्री उद्धवजी महाराज मंडलिक,महंत सुनीलगिरी महाराज,ओम शांती केंद्राच्या राजयोगिनी वंदना दिदी,अगस्ती मंदिराचे हभप भिसे बाबा,मंदिर व्यवस्थापक संभाजीराव ठाणगे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तळी भंडारा कार्यक्रम पार पडला.यावेळी भाविकांनी येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत भंडारा खोबऱ्याची उधळण केली.
पुरातन मंदिराजवळच नव्याने बांधण्यात आलेल्या खंडोबा म्हाळसादेवी,सच्चिदानंद बाबा,नारदमुनी मंदिराचा चंपाषष्ठीलाच मंदिराचा ६ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.यानिमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व रात्री नामवंत किर्तनकारांची कीर्तने भक्तिमय वातावरणात पार पडली.देवस्थानचे अध्यक्ष डॉ.मुरलीधर कराळे व विश्वस्त मंडळाच्या वतीने आलेल्या भाविकांचे स्वागत करण्यात आले.येथे चंपाषष्ठी निमित्त सकाळी श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने पारायण करण्यात आले.
चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्ताने मंदिर प्रांगणात मोठी यात्रा भरली होती.यावेळी दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांना वांगे भरीत व बाजरीच्या भाकरीचा महाप्रसाद वाटण्यात आला. “येळकोट येळकोट जय मल्हार” च्या गजरामुळे येथील वातावरण म्हाळसा खंडोबामय बनले होते.यावेळी मंदिर प्रांगणात मोठी यात्रा भरली होती विविध स्टॉलवरील वस्तू खरेदीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
फोटो ओळी-चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्ताने नेवासा बुद्रुक येथील नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरातील आकर्षक खंडोबा म्हाळसादेवीची घोडेस्वार मूर्ती समवेत पुरातन मंदिरातील खंडोबा मूर्ती व उपस्थित भाविक दिसत आहे



















