सांगली – सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या अग्रगण्य शेड्युल सहकारी बँकेने 2024-25 या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी नोंदवत तब्बल रु.14.50 कोटी इतका निव्वळ नफा मिळवला आहे. आर्थिक स्थैर्य, ग्राहकांचा विश्वास, संचालक मंडळांचे मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांचे समर्पित योगदान यांच्या जोरावर बँकेने प्रगतीचा नवा टप्पा गाठला आहे. २००० कोटी एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. बँकेच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत संचालक मंडळाने सभासदांना 7 टक्के लाभांश जाहीर केला व लगेचच त्यांचे खातेवर जमा करण्यात आला होता.
दि.१३ ऑक्टोबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालक श्री.एच.वाय.पाटील, शैलेंद्र तेलंग,सागर घोंगडे, संजय धामणगावकर व अन्य संचालक यांनी बोनस देण्यासंबंधी सूचना केली व लगेच बैठकीत कर्मचाऱ्यांसाठी एक पगार दिवाळी बोनस जाहीर करून आनंद द्विगुणित केला आहे. या निर्णयामुळे बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बँकेचे अध्यक्ष गणेशराव गाडगीळ, उपाध्यक्ष सी.ए श्रीपाद खिरे, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली बँकेने मागील वर्षभरात ठेवी, कर्जवाटप, गुंतवणूक व नफा या सर्व क्षेत्रांत सातत्यपूर्ण वाढ साधली आहे.
बँकेचे चेअरमन गणेशराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली बँकेने यशस्वी घोडदौड सुरू आहे, चेअरमन व संचालक मंडळ यांनी दिलेले आश्वासन ज्यामध्ये सभासद साठी लाभांश, कर्मचाऱ्यांसाठी पगार वाढ, तसेच कर्मचारी यांना बोनस या आश्वासनाची पूर्तता केली आहे. बँकेच्या संचालक मंडळाने व्यक्त केले की “बँकेच्या यशामागे वरिष्ठ अधिकारी यांचे बरोबरीने सर्वच कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांचे श्रम, प्रामाणिकता आणि सेवाभावामुळेच बँकेने उत्कृष्ट आर्थिक प्रगती साधली आहे. दिवाळी बोनस हा त्यांच्या कार्याची कृतज्ञ दखल आहे.” बऱ्याच वर्षानंतर बोनस जाहीर झाल्या मुळे कर्मचारी वर्गात एक आनंदाचे व उत्साहाचे वातावरण झाले आहे. सांगली अर्बन बँकेने डिजिटल बँकिंग, ग्राहक सेवा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर भर देत आपली सेवा गुणवत्ता अधिक मजबूत केली आहे. येत्या काळात बँक नवीन शाखा विस्तार, ग्राहक अनुकूल योजना व नव्या डिजिटल सेवा सुरू करण्याच्या दिशेने कार्यरत आहे.या भरघोस बोनस घोषणेने सांगली अर्बन बँकेतील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांनी संचालक मंडळाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
ग्राहकांना केवळ दिवाळी निमित्त अल्प व्याज दरात कर्ज योजना जाहीर केल्या आहेत यामध्ये वाहन कर्ज केवळ ८.२०% व गृह कर्ज केवळ ७.७५% इतक्या अल्पदरात मिळणार आहे. तरी या फेस्टिवल कर्ज योजनांचा लाभ घ्यावा असेही आवाहन बॅंकेतर्फे करण्यात आले आहे.

















