सोलापूर – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या विविध माथाडी कामगार संघटनांनी आज शनिवार दि.६ डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथील चैत्यभूमीला बाबासाहेबांच्या दर्शनासाठी दाखल झाल्याने सोलापूर बाजार समितीमधील कांदा बाजार पेठ एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आली. एक दिवसाच्या बंदमुळे बाजार समितीचे लाखोंचे उत्पन्न तसेच कोटींची उलाढाल ठप्प झाली.
दरम्यान, कामगार संघटनांच्या निवेदनाद्वारे सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील कांदा बाजारपेठेला एक दिवस सुट्टी देण्यात आली. रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने सोमवारी बाजारपेठ सुरळीत होईल अशी माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.एरवी गजबजलेली कांदा बाजारपेठ शनिवारी पूर्णतः बंद ठेवल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पहावयास मिळाला.
फोटो ओळ – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी कांदा बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.



















