सोलापूर : आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाने दिवाळीपूर्वीच मोठा धमाका केला आहे. शहरात ऑपरेशन लोटस यशस्वी झाले असून गुरुवारी रात्री मुंबईत एका महत्त्वाच्या बैठकीत दोन माजी उपमहापौर, पाच माजी नगरसेवक यांच्यासह मातब्बरांनी भाजपात प्रवेश केला आहे. काही जणांची घरवापसी झाली आहे. यामुळे भाजपला अधिक बळ मिळाले आहे.
मुंबई येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा प्रवेश कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी आ. सचिन कल्याणशेट्टी , आ. देवेंद्र कोठे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महिला अध्यक्षा रंजीता चाकोते आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी माजी उपमहापौर पद्माकर काळे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी सभागृह नेता सुरेश पाटील, बिज्जू प्रधाने, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, माजी नगरसेवक सुभाष डांगे, माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, मारुती तोडकरी, माजी नगरसेविका कल्पना क्षीरसागर, नागनाथ क्षीरसागर, सुनील भोसले, बिपीन पाटील, मदन क्षीरसागर, रवी काळे, मेघराज कल्याणकर, बाळासाहेब तांबे, सुरेश तोडकरी आदींनी भाजपा मध्ये अधिकृत प्रवेश केला.