देगलूर/प्रतिनीधी
आगामी 90-देगलूर-बिलोली विधानसभा निवडणुकीत आपण देगलूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी आपण पक्ष नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्याला कामाला लागा असे आदेश दिल्याचे निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांनी देगलूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असून काँग्रेस व भाजप या प्रमुख पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार आपल्या नेत्यांना भेटत आहेत. देगलूर विधानसभा मतदारसंघ काही अपवाद वगळता सतत काँग्रेसपक्षाच्याच पाठिशी राहिला आहे.
महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाच्या वाट्याला असून या पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अनेकजण पक्षपातळीवर प्रयत्न करित असून निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे हे मागील दोन महिन्यापासून मतदारसंघातील मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ते इच्छुक उमेदवार होते मात्र त्यांना त्यावेळी काँग्रेस पक्षाकडून सबूरी राखण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र मागील काही महिन्यात राज्याच्या राजकारणात तसेच मतदारसंघातील राजकीय बदल झाल्याने या वेळेस विद्यमान आमदारांना डावलून नवखा उमेदवार काँग्रेस पक्षाकडून उतरविला जाणार आहे. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण येथेच झाल्याने बी. एम. कांबळे यांना हा मतदारसंघ नवखा नाही.
प्रशासकीय सेवेत असताना सुध्दा. त्यांचे कायम लक्ष देगलूरकडेच होते. कोरोना काळात सुध्दा आपण जातीने लक्ष ठेवून होतो. अनेक गरजूंना मदत देण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचे बी. एम. कांबळे यांनी पत्रकारांना सांगितले. अधिकारी राहिल्याने मतदारसंघ विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी आपल्याकडे आराखडा असल्याचे ही त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपल्याला कामाला लागा असे आदेश दिल्याचे इच्छुक उमेदवार बी. एम. कांबळे यांनी सांगितले. आपल्याला मतदारांकडून उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे ही त्यांनी सांगितले. यावेळी आरळी येथील उपसरपंच संजय नरहरे, पांडूरंग नरहरे आरळी, जनार्दन वाघमारे बिलोली, देगलूर येथील सेवानिवृत्त ज्येष्ठ
विस्तार अधिकारी दयानंद सुर्यवंशी आदिसह पत्रकार बांधव उपस्थित होते