सोलापूर : महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित झालेल्या ॲडव्हेंचर पार्क,स्ट्रीट बाजार व रंगभवन प्लाझा येथे केली पाहणी केली. दरम्यान, स्ट्रीट बाजाराची लिलाव प्रक्रिया तात्काळ राबविण्याच्या तसेच वीर सावरकर मैदानातील जागा खाद्यपदार्थ विक्री व पार्किंगसाठी भाड्याने देण्यासाठी लिलाव प्रक्रिया करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यावेळी उपायुक्त आशिष लोकरे, कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेश परदेशी, सहाय्यक अभियंता (विद्युत) महादेव इंगळे, कनिष्ठ अभियंता सतीश बोरला, स्वप्नील पवार, उद्यान अधीक्षक स्वप्नील सोलंकर, स्वामीनाथ कल्याणशेट्टी यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्तांनी ॲडव्हेंचर पार्क परिसरातीले ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर तलाव शेजारील लेक फ्रंटवरील वॉकिंग ट्रॅकवरील गवत काढणे, वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटणे आणि झाडांची देखभाल करण्याच्या सूचना दिल्या.
रंगभवन प्लाझा येथील एलईडी दुरुस्तीचे काम एका आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना मक्तेदारांना दिल्या आहेत. प्लाझा परिसरातील ओपन गटारातील माती काढून स्वच्छता करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
स्ट्रीट बाजाराची लिलाव प्रक्रिया तात्काळ राबविण्याच्या तसेच वीर सावरकर मैदानातील जागा खाद्यपदार्थ विक्री व पार्किंगसाठी भाड्याने देण्यासाठी लिलाव प्रक्रिया करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी पाहणीदरम्यान सर्व विभागांनी एकत्रित समन्वय साधून स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित केलेल्या सुविधांची नियमित देखभाल, स्वच्छता व व्यवस्थापन उत्तम राखावे, असे निर्देश दिले.
आरोग्य निरीक्षकाला दंड करण्याचे आदेश
ॲडव्हेंचर पार्क भिंतीलगत असलेल्या झाडांचे बुंधा व आजोरे न उचलल्याबद्दल संबंधित आरोग्य निरीक्षकावर ५०० रुपयांचा दंड आकारण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. पार्कबाहेरील किरकोळ दुरुस्ती तसेच तलाव परिसरातील वाढलेली झाडे तत्काळ छाटण्याचे निर्देश दिले. तसेच पार्कमधील ई-टॉयलेट त्वरित दुरुस्त करून सुरु करण्याचे आदेशही दिले.


























