बार्शी – सोजर इंग्लिश स्कूल माध्यमिक विभागाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी प्रशालेत ‘सोजर मास्टरशेफ’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता ५ ते ७ व ८ ते १० या दोन गटात स्पर्धा घेण्यात आली.
‘फुड विदाऊट फायर’ संकल्पना हे या स्पर्धेचे वैशिष्ठ्य होते. स्पर्धेत पाककलेतील कौशल्य पणाला लावताना नाविन्यपूर्ण पदार्थांंची निर्मिती व सौंदर्यपूर्ण मांडणी यांना स्पर्धेत प्राधान्यक्रम देण्यात आला. चाट, ड्रायफ्रुट वापरुन बनवलेले केक, लाडू, सॅंडवीच, फ्रॅंकी, रोल्स, फ्रुट सॅलड, कॉर्न चाट, भेळ, सरबते अशा अनेक पदार्थांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी त्यांची डिश नाविन्यपूर्ण आणि आकर्षक करण्यासाठी अभिनव कल्पना वापरल्या. विद्यार्थ्यांचा स्पर्धेतील सहभाग आनंददायी होता.
या स्पर्धेचे मुल्यमापन हॉटेल सरनोबत येथील शेफ सागर कोकाटे आणि मनोहर पाटील यांनी केले. ५ ते ७ या गटातून अलिना मोमीन, समन मुजावर व अलिना तांबोळी व ८ ते १० या गटातून शिवा मौर्य, श्रुती पडवळ व अब्दुल्ला सय्यद यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अर्चना शिंदे यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागसह प्रशालेतील सर्व शिक्षकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.


















