अहिल्यानगर – ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधी अंतर्गत मिळाल्या नसलेल्या आर्थिक मालमत्तांच्या निकालिकरणासाठी विशेष जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन शनिवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात आले आहे. हे शिबिर अहिल्यानगर येथील लक्ष्मीनारायण कार्यालय, स्वस्तिक चौक, पुणे एसटी बसस्थानकाजवळ येथे होणार असून जिल्ह्यातील सर्व बँका यात सहभागी होणार आहेत.
         
या शिबिरात खातेदारांच्या दावा न केलेल्या ठेवींचे तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे. ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधी अंतर्गत सर्व नामनिर्देशित आणि पात्र लाभार्थ्यांनी या शिबिरात उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
       
वित्तीय सेवा विभाग आणि राज्यस्तरीय बँक समिती यांच्या निर्देशानुसार हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना त्यांच्या हक्काच्या ठेवी परत मिळवण्याची संधी मिळणार आहे.
       
१० वर्षांहून अधिक काळ दावा न केलेल्या ठेवी ‘ठेवीदार शिक्षण व जागरूकता निधी’ मध्ये हस्तांतरित केल्या जातात. खातेदारांना या ठेवी परत मिळवण्याचा पूर्ण अधिकार असल्यामुळे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक आशिष एम. नवले यांनी आवाहन केले आहे.
 
	    	 
                                



















 
                