सोलापूर : राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवा निमित्त व राष्ट्रीय युवक दिनाची औचित्य साधत समृद्धी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, सोलापूर अंतर्गत समृद्धी कला मंच यांच्या वतीने ११ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता शहरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहामध्ये या राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समृद्धी कला मंचचे प्रमुख कार्यवाह संजय सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी समृद्धी कलामंचच्या पोस्टरचे प्रकाशन जेष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिवाजी शिंदे, प्रा. अशोक निंबर्गी, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समृद्धी कलामंचचे अध्यक्ष स्थान कृष्णकांत चव्हाण हे भूषवणार आहेत. स्पर्धेसाठी प्राथमिक फेरीचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले असून अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांना प्रत्यक्ष मंचावर सादरीकरण करण्याची संधी दिली जाणार आहे.
स्पर्धेत प्रथम क्रमांकास १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ११ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकास ७ हजार रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याशिवाय उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रथम क्रमांकास ५ हजार रुपये, तर द्वितीय क्रमांकास ३ हजार रुपये व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
स्पर्धेसाठी विविध विषय असून यामध्ये चालू जागतिक आंदोलने, राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका, समाजातील नैतिक मूल्यांचा ऱ्हास, प्राथमिक शिक्षणातील समस्या, संत साहित्याचे योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता – संधी व आव्हाने, सोलापूर जिल्ह्याच्या विकासाच्या दिशा, शेतकऱ्यांच्या समस्या तसेच महिलांचा सामाजिक प्रवास आदी विषयांचा समावेश आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून न्यू इंग्लिश स्कूल बेगमपूरचे माजी प्राचार्य रामचंद्र दत्तू समृद्धी सोशल फाउंडेशनचे संचालक चंद्रकांत होळकर, समृद्धी कला मंचचे उपाध्यक्ष सुमित फुलमाडी, अजित संगवे, साहित्य रसिक फैज अहमद बेगमपुरे माजी प्राचार्य राजू पॅटी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


























