किनवट / नांदेड : सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत एचडीएफसी बँक, किनवट शाखेच्या वतीने “परिवर्तन उपक्रमांतर्गत” भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन (दि.०५) रोजी करण्यात आले. या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण २४ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवतावादी कार्याला सहकार्य केले.
या शिबिरात रक्त संकलनाची जबाबदारी कलावती स्वयंसेवक रक्त संकलन बँक, आदिलाबाद यांनी पार पाडली. कार्यक्रमाचे उद्घाटन नामांकित उद्योजक गौरव नेम्मानिवार व गंगासिंग बस्सी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, एका थेंबातून अनेकांचे जीव वाचू शकतात,” असे सांगत नागरिकांना अशा उपक्रमात अधिकाधिक सहभागी होण्याचे आवाहन केले.
एचडीएफसी बँकेच्या देशव्यापी संकल्पनेनुसार “कोणालातरी वाचवण्याची भावना” (Feeling of Saving Someone) या अभियानांतर्गत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या भावनेने प्रेरित होत अनेकांनी प्रथमच रक्तदान करून सामाजिक कार्यात हातभार लावला. शिबिरात बँकेचे अधिकारी, कर्मचारी, ग्राहक तसेच शहरातील नागरिकांनी उल्लेखनीय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बँकेचे अधिकारी नारायण जोशी, गोविंद बडे यांच्यासह सर्व सहकारी कर्मचारी व अधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिबिरातील शिस्तबद्ध व्यवस्थापन, रक्तदात्यांची नोंदणी, आरोग्य तपासणी, तसेच अन्य सर्व सोयींची उत्तम आखणी करण्यात आली. हा उपक्रम केवळ एक सामाजिक घटना नसून, समाजासाठी प्रेरणादायी पाऊल ठरला आहे. एचडीएफसी बँक किनवट शाखेने समाजातील जबाबदारी जपून मानवी मूल्यांना अधोरेखित करणारा हा प्रशंसनीय उपक्रम राबविल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक व्यक्त केले जात आहे.























