राष्ट्रप्रेमाने भारावून प्राध्यापकाचा थेट भारत-पाक सीमेपर्यंत सायकल प्रवास
१२५० किमी अंतर कापून केले सैनिकांना अभिवादन
कुडाळ ते नडाबेट पर्यंतचा प्रवास ११ दिवसात केला पूर्ण
सिंधुदुर्ग :
‘यात्रा राष्ट्रप्रेमाची’ या उपक्रमाअंतर्गत आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या जवानांना भेटावं, त्यांना मानवंदना द्यावी या हेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक अजित कानशिडे यांनी कुडाळ ते नडाबेट-गुजरात असा १ हजार २५० किलोमीटरचा प्रवास सायकलने पूर्ण केला.
भारत-पाकिस्तान सीमेवरच्या नडाबेट याठिकणी त्यांनी भारतीय सैनिकांची भेट घेऊन त्यांना मानवंदना दिली. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांना ११ दिवस लागले. एकूणच या प्रवासात राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, भारतीय सैन्याची महती, मानवता, बंधुता यासह विविध भावना इतर अनेकांच्या सहकार्यामुळे जागृत करता आली असं प्रा. कानशिडे यांनी सांगितलं. या संपूर्ण प्रवासात पत्रकार बाळा राणे यांनी त्याना चारचाकीतुन साथ केली.