आषाढी वारीसाठी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीनं आज त्र्यंबकेश्वर इथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. पहाटेच्या सुमाराला पारंपरिक पूजाविधी झाल्यानंतर टाळमृदुंगाच्या गजरात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली. यावेळी विठुरायाच्या नामघोषानं त्र्यंबकनगरी दुमदुमून गेली होती.
दिंडीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी त्र्यंबकेश्वर इथं जमले होते. त्यांच्या हाती असलेले भगवे ध्वज आणि ज्ञानदेव, तुकाराम हा गजर यामुळे सारं वातावरण भक्तीमय झालं होतं. पानाफुलांनी सजवलेल्या चांदीच्या रथामध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांची मूर्ती आणि पादुका ठेवल्या होत्या.