सोलापूर – येथील श्राविका संस्था संचलित पी. एस्. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्री-प्रायमरी, प्रायमरी व हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. संतोष खेंडे , राष्ट्रीय योगा सन चॅम्पियन कु. प्रणाली शिंदे उपस्थित होते. त्यांच्या समवेत व्यासपीठावर श्राविका संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी देवई शहा,प्रायमरीच्या पर्यवेक्षिका सौ. कल्पना रामावत, प्री-प्रायमरी च्या समन्वयक सौ. अर्चना अक्कलकोटे, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती कांबळे,पर्यवेक्षक श्री. जयेश शिरढोणे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे यांचे स्वागत व सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका व पर्यवेक्षक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सौ. अर्चना अक्कलकोटे यांनी प्रमुख पाहुणे श्री. संतोष खेंडे यांचा तर कु. राधिका माने हिने राष्ट्रीय योगा चॅम्पियन कु. प्रणाली शिंदे हिचा परिचय करून दिला. यानंतर प्रमुख पाहुणे व इतर मान्यवर यांच्या हस्ते सरस्वतीचे व मैदानाचे पुजन करून क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून व आकाशात फुगे सोडून उद्घाटन झाल्याचे जाहीर करण्यात आले.व विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.
या उद्घाटन समारंभानंतर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ध्वज संचलनाव्दारे व्यासपीठावरील मान्यवरांना मानवंदना दिली.
यानंतर कार्यक्रमात रंगत आणण्यासाठी प्रायमरीचे क्रीडा व योग शिक्षक श्री. रोहन घाडगे,हायस्कूलचे क्रीडा शिक्षक श्री. अजित पाटील कराटे प्रशिक्षक श्री. सोमनाथ मगर व नृत्यशिक्षक श्री. गणेश कुडक्याल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रायमरी व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पध्दतीने विविध कलाप्रकार सादर केले. यामध्ये समुह नृत्य,सामुदायिक कवायत,कराटे व योगासनाचे विविध प्रकार, मेपोरीबन, झांज व लेझीम पथकाचे सादरीकरण इ. सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यास सर्वांनी मनापासून दाद दिली.
या सादरीकरणानंतर प्रमुख पाहुणे श्री. खेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी आपल्या भाषणातून बोलताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी अंगी खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे. शाळा अंतर्गत व शाळा बाह्य विविध क्रीडा स्पर्धेत भाग घेतला पाहिजे.त्यामुळे आरोग्य उत्तम राहते.तसेच त्यांनी केंद्र शासनाच्या खेलो इंडिया या उपक्रमाबाबत तसेच क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळविल्यास शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीबाबत माहिती दिली. तर कु. प्रणाली शिंदे हिने आपल्या भाषणातून अभ्यास व खेळ हे दोन्ही महत्त्वाचे असून त्यामध्ये समतोल साधून खडतर परिश्रम केल्यास हमखास यश मिळते असे सांगितले.
या कार्यक्रमाचा समारोप करतेवेळी सह शिक्षिका सौ. जयश्री गुंड यांनी सर्वांचे आभार मानले.
या शानदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह शिक्षिका सौ. धनश्री शहा यांनी केले.तसेच या कार्यक्रमासाठी शाळेच्या पालक-शिक्षक संघाचे सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते.
हा उद्घाटन सोहळा यशस्वी करण्यासाठी क्रीडाशिक्षक श्री. रोहन घाडगे, श्री. सोमनाथ मगर श्री. अजित पाटील व नृत्यशिक्षक श्री. गणेश कुडक्याल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सर्व विभागाचे शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



















