जालना – मौजे वडीगोद्री तालुका अंबड येथे मुख्यमंत्री बळीराजा पांदण शेत रस्ते योजनेच्या अंतर्गत पांदण रस्ते, गाडी रस्ते व शिव रस्ते यांच्या सीमांकनाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. तभा वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी दि 23 डिसेंबर अंबड तालुक्यामध्ये वडीगोद्री या गावापासून सुरू करण्यात येत आहे. वडीगोद्री शिवारातील रस्त्यांच्या सीमांकनाच्या कामास महसूल विभाग व भूमी अभिलेख विभागा च्या कर्मचारी यांच्या कडून सुरुवात करण्यात आली.
शिवारातील रस्त्यांचे सीमांकन करण्यापूर्वी माननीय तहसीलदार श्री विजय चव्हाण यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गावकऱ्यांशी संवाद साधला व सदर योजनेचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले. तसेच सदर योजनेमुळे शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असून शासन सदर रस्त्यांच्या मजबुतीकरणाचे काम योजनेच्या माध्यमातून करणार आहे असे यावेळी सांगितले.
ग्रामपंचायत वडीगोद्रीच्या वतीने तहसीलदार विजय चव्हाण, मंडळ अधिकारी संदीप नरुटे व ग्राम महसूल अधिकारी योगेश गुरव यांचे स्वागत करण्यात आले व शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाची सोडवणूक करणारी रस्त्याबाबतची शासनाची योजना वडीगोद्री या गावापासून सुरुवात केल्याबद्दल त्यांनी महसूल प्रशासनाचे गावकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले व आनंद व्यक्त केला.
रस्त्यांच्या सीमांकनाच्या कामावेळी तहसीलदार विजय चव्हाण मंडळ अधिकारी संदीप नरुटे ग्राम महसूल अधिकारी योगेश गुरव तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत चे सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


























