पंढरपूर – पंढरपूर नगरपरिषदेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात सोमवारी (ता.१७) नगरसेवकपदासाठी २५६ एवढ्या विक्रमी संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर नगराध्यक्षपदासाठी ४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे नगरसेवकपदासाठी अंतिम दिवसापर्यंत एकुण ३६६ तर नगराध्यक्षपदासाठी एकुण ८ अर्ज दाखल झाल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
पालिका निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार हा शेवटचाच दिवस होता. त्यामुळे सहाजिकच आज मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होणार हे स्पष्ट झालेले होते. त्यामुळे पालिका सभागृहात गर्दी होणार असल्याने नगरपालिका परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगरपालिका रस्त्याच्या पुढील असलेल्या भादुले पुतळा चौका पर्यंतच्या रस्त्यावर दोन्ही बाजुला वाहनांना मज्जाव करण्यात आलेला होता. या रस्त्यावर दोन्ही बाजूला बँरेकेडींग करण्यात आलेले होते. अनेक उमेदवार आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पालिकेच्या इमारतीकडे येताना दिसत होते. अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रभागातून शक्तीप्रदर्शन करीत फटाक्यांची आतिषबाजी देखील केली.
———————-
नगराध्यक्षपदासाठी दाखल अर्जाची माहिती –
पंढरपूर पालिकेचे नगराध्यक्षपद हे आरक्षण सोडती मध्ये सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालेले आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी रविवारी जैतुनबी अब्दुलरौफ मुलाणी, प्रणिता भगिरथ भालके (दोन अर्ज) आणि कांचन तुळजाराम बंदपट्टे असे एकुण चार उमेदवारी अर्ज दाखल झालेले होते. तर सोमवारी शेवटच्या दिवशी भाजपाकडून शामल लक्ष्मण शिरसट (पापरकर), आमदार अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल परिवर्तन आघाडीकडून सारिका राहुल साबळे यांनी आपले उमेदवारी अर्ज केल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
———————-
आमदार आवताडेंच्या कार्यकर्त्यांना स्थान नाही –
पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणूकी मध्ये आमदार समाधान आवताडे यांच्या पंढरपूरातील समर्थक कार्यकर्त्यांना स्थान न दिल्यामुळे आमदार आवताडेंचे समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात होती. त्यामुळे बऱ्याच कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
———————
अपक्षाची संख्या अधिक –
पालिका निवडणूकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जामध्ये आघाड्यांकडून उभे असलेल्या उमेदवारांपेक्षा अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या जास्तीची आहे. दरम्यान अर्ज छाननी मध्ये किती उमेदवारांचे अर्ज बाद होतात आणि त्या नंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदती पर्यंत किती अपक्ष उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेतात त्यानंतरच एकुण उमेदवारांची संख्या स्पष्ट होईल.
————————
२५ नोव्हेंबर पर्यंत घेता येणार उमेदवारी अर्ज मागे –
नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सोमवार ही अंतिम तारीख होती. मंगळवारी दि.१८ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २५ नोव्हेंबर पर्यंत आहे. २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.


















