पंढरपूर – फलटण येथील महिला डाँक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयीत आरोपी तथा निलंबित पोलिस निरीक्षक गोपाळ मदने याचे शेवटचे लोकेशन पंढरपूरात दाखविल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पंढरपूर आणि फलटण पोलिसांकडून सध्या पंढरपूरात त्याचा शोध सुरु करण्यात आला आहे.
फलटण येथील शासकीय रुग्णालयातील महिला डाँक्टरने नुकतीच आत्महत्या केलेली आहे. आत्महत्या करताना त्यांनी आपल्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये फलटण येथील पोलिस निरीक्षक गोपाळ मदने तसेच बनकर यांच्यामुळेच आपण आत्महत्या करीत असल्याचे नमूद केल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर गोपाळ मदने यास त्वरीत निलंबित करण्यात आले. त्याला शोधण्यासाठी फलटण पोलिसांकडून आपली सर्व यंत्रणा कामाला लावली आहे.
दरम्यान मदने याचा शोध घेत असताना त्याचे शेवटचे लोकेशन पंढरपूरात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर फलटण पोलिसांनी पंढरपूर पोलिसांशी संपर्क साधून त्यांना या बद्दलची माहिती दिल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले. या माहिती नंतर पंढरपूर पोलिस सर्तक झाले असुन येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, शहर पोलिस ठाणे, तालुका पोलिस ठाणे तसेच ग्रामीण पोलिस ठाण्या मधील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. या चारही पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तसेच फलटण पोलिसांच्या मदतीने मदने याचा पंढरपूर तसेच आसपास तपास सुरु करण्यात आला आहे.
पंढरपूर शहराच्या विविध भागातील तसेच तालुक्यातील प्रमुख ठिकाणी असलेल्या सीसीटिव्हीची माहिती घेऊन त्या त्या ठिकाणच्या सीसीटिव्हीव्दारे तेथील फुटेज मिळवून त्या फुटेजव्दारे त्याचा ठावठिकाणी शोधला जात आहे. त्यासाठी पोलिसांची खास पथके तयार करण्यात आली असून ती तपासासाठी विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
———————
सुट्यांमुळे पंढरपूरात गर्दी
दिपावलीच्या सुट्यांमुळे गेल्या दोन,तीन दिवसांपासून विठ्ठलरुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे. शहरातील सर्व मठ,धर्मशाळा,मंदिर परिसरातील वाडे, घरे तसेच शहरातील भक्तनिवास हाऊसफुल्ल झालेली आहेत. या गर्दीचा फायदा घेऊन गोपाळ मदने यांनी पंढरपूरात कुठे आसरा घेतला आहे का ? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.




















