पंढरपूर – संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर ( महाराष्ट्र ) ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) या सुमारे ५ हजार किलोमीटर लांब पल्याच्या व ३१ दिवस चालणाऱ्या देशातील पहिल्या अध्यात्मिक रथयात्रा व सायकल वारीची बुधवारी उत्साहात सांगता झाली.
भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार कमिटी व समस्त नामदेव शिंपी समाजाच्या वतीने संत नामदेव महाराज यांची ७५५ वी जयंती , कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा व शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव यांच्या ५५६ व्या प्रकाश पर्वानिमित्त सालाबादप्रमाणे यंदा रविवार दि. २ नोव्हेंबर ते बुधवार दि. ३ डिसेंबर २०२५ दरम्यान ३१ दिवसांची भव्य रथयात्रा व सायकल वारी आयोजित करण्यात आली होती .
वारीचे हे चौथे वर्ष होते . या वारीने महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश व मध्यप्रदेश या आठ राज्यातून प्रवास केला . या वारीत १०० सायकलस्वार व ५० भजनी मंडळी सहभागी झाली होती . देशातील या पहिल्या अध्यात्मिक सायकल वारीचे नेतृत्व भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी केले होते.
———————–
सायकल वारीचा समारोप
महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा व पंजाब राज्याचा दौरा करीत आलेल्या सायकल वारीची सांगता २५ नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र घुमाण येथे झाली तर रथयात्रेची सांगता श्री क्षेत्र पंढरपूर येथे संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या नामदेव वाड्यात बुधवारी झाली . संत नामदेव महाराज यांचे १६ वे वंशज माऊली महाराज नामदास यांच्या हस्ते पादुकांची विधीवत पूजा व आरती करण्यात आली.
देह जावो अथवा राहो ।
पांडुरंगीं दृढ भावो ॥
या संत नामदेव महाराज यांच्या अभंगाने वारीची सांगता झाली.
————————
यावेळी संत नामदेव महाराज यांचे १६ वे वंशज मुकुंद महाराज नामदास , मुरारी महाराज नामदास पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर टेमघरे, उपाध्यक्ष सुभाष भांबुरे, सचिव ॲड विलास काटे , सहसचिव राजेंद्रकृष्ण कापसे , खजिनदार मनोज मांढरे, विश्वस्थ राजेंद्र मारणे आदी मान्यवर उपस्थित होते .
























