अक्कलकोट – शहरातील वीर सावरकर चौकातील (तूप चौक ) सामाजिक कार्यकर्त्याची पाणपोई ही नियमांच्या कचाट्यात सापडल्याने अखेर पाणपोई बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरपरिषदेच्या विचित्र नियमांमुळे कडक उन्हाळ्यात पाणपोई बंद करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अक्कलकोट शहरात गेल्या १८ वर्षापासून उन्हाळ्यात पाणपोईद्वारे समाजसेवा करण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते वसंत देडे हे करत आहेत. शहरातील विविध भागात नगर परिषदेकडून रीतसर परवाना घेऊन वसंत देडे पाणपोईद्वारे नागरिकांना , अबाल वृद्धांना थंड पाणी पाजण्याचे लोकोपयोगी काम करत असतात.वसंत देडे यांनी यावर्षी शहरातील वीर सावरकर चौक परिसरात पाणपोई सुरू केली होती. या पाणपोईमुळे शहरातील व परगावच्या अबाल वृद्धांना व नागरिकांना थंड पाण्याची मोठी सोय होत होती. सर्वसामान्य माणसाकडे बाटलीतील पाणी विकत घेऊन पिण्यासाठी पैसे नसतात. ती माणसे या पाणपोईवर येऊन थंड पाणी पिऊन आत्मिक समाधान मानत असत. वसंत देडे यांनी सुरू केलेली पाणपोई ही नगर परिषदेने नियम व अटींच्या मुद्द्यावर पाणपोईचे स्थळ हलविण्यास भाग पाडले. वीर सावरकर चौकातील काही व्यापारी लोकांनी ही पाणपोई बंद करण्यासाठी राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. लोकांसाठी काम करणाऱ्या पाणपोई चालक , सामाजिक कार्यकर्ते वसंत देडे यांनी नगरपरिषदेच्या विचित्र अटींमुळे शेवटी पाणपोई बंद करण्याचा निर्णय घेतला. ज्या वीर सावरकर चौकात वसंत देडे यांनी पाणपोईची सुरुवात केली होती या ठिकाणची पाणपोई बंद केली. कडक उन्हाळ्यात नागरिकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला नगरपरिषदेने नियम दाखवून पाणपोई बंद करण्यास भाग पाडल्याने नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. समाजातील विधायक काम करणाऱ्या समाजसेवकांना काम न करू देणाऱ्या नगरपरिषद प्रशासनाच्या एकूण भूमिकेबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
























