सोलापूर – आत्मशांती असेल तर भक्ती निर्माण होते आणि परमप्रेम रूप हेच श्रीनारद भक्तीचे पहिले सूत्र असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी केले. महाराष्ट्र साहित्र परिषद, शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्रन क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पु ना गाडगीळ यांच्या सहकार्याने आयोजित विवेकाची अमृतवाणी या तीन दिवशीय दिवाळीपूर्व व्याख्यानात ते बोलत होते. प्रारंभी रोजगार हमी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शहाजी पवार यांनी विवेक घळसासी यांना पुष्पहार अर्पण करून स्वागत केले त्यानंतर पहिल्या दिवसाच्या प्रवचनाला प्रारंभ झाला.
लोकमान्य टिळक सभागृह अॅम्फी थिएटर मध्ये सकाळी 6.25 वाजता तीन दिवस विवेकाची अमृतवाणी दिवाळीपूर्व निरूपणाचे आयोजन करण्यात आले असून पहिल्याच दिवशी रसिक श्रोत्यांची मोठी गर्दी होती. ईश्वराकडे पोहोचण्याचे भक्ती हे सुलभ साधन आहे. भाव शुध्द असले की मधुरता आपल्या जीवनात येते आणि त्यातून प्रेम, ज्ञान आणि भक्ती समर्पण येतेच. प्रेम अनादी, अनंत आहे असे सांगून त्यांनी काही उदाहरणे सांगितले. प्रवचनमालेच्या पहिल्या दिवशी सोलापूरकरांचे त्यांनी कौतुक केले. उत्सवाचे शहर म्हणून वेगळ्या मार्गावर चाललेल्या सोलापूरकरांनी डिजे मुक्ती आणि भोंगा मुक्ती करून सवार्ंसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी, कष्टकरी, व्यापारी यांचे मोठे नुकसान झाले त्यांना सोलापूरकरांनी मदतीचा हात देवून माणुसकी दाखवून दिली असाही उल्लेख त्यांनी यावेळी केला. या पहिल्या दिवशीच्या विवेकाच्या अमृतवाणीला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.