बीड : निवडणूक म्हटली की बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघ नेहमीच सगळ्यांच्या नजरेसमोर येतो. परळीतील मुंडे बंधू-भगिनींचं नाव राज्याच्या राजकारणात प्रामुख्याने घेतलं जातं. काही वर्ष एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे बहीण-भावात यावेळी कोण सरस ठरणार, याची उत्सुकता सर्वांना होती. मात्र परळीत झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात नवे समीकरण उघड झाले आहे, आता मुंडे बहीण भावाचं कसं लढायचं हे ठरलं आहे. मात्र यात आता त्या दोघांसमोर कोणाचे आव्हान असेल, हे समीकरणे देखील पाहणं गरजेचं आहे.
मुंडे म्हटलं की त्यांच्यासमोर कोणताही राजकीय पक्ष हा लढत देण्यासाठी कमी पडतो. मात्र आता परळीतील समीकरणही बदलले आहे. त्यात बीड जिल्ह्याचं राजकारणही बदललेलं पाहायला मिळत आहे. आता परळीत मुंडे बहीण भावासमोर फक्त बबन गीते आणि काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख ही दोन नावं सध्या समोर येत आहेत.
बबन गित्ते हे शरद पवार गटाचे उमेदवार असल्याची चर्चा होत आहे, तर राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे उमेदवार लढतीला इच्छुक आहेत, आता मुंडे बहीण भावांची लढत या दोघांसोबत तर आहेच, पण इतरही पक्ष या लढतीत उतरतील. मात्र यात कोण विजयी होणार, या चर्चेला मोठं उधाण आलं आहे.
बीड जिल्ह्यातील राजकारणात गेल्या महिन्याभरात अनेक बदल झालेले पाहायला मिळत आहेत. एकीकडे परळीत मुंडे बहीण भावांतील संघर्ष महाराष्ट्राने नेहमीच पाहिल. यावेळेसही असा संघर्ष पाहायला मिळेल, अशी चर्चा जनमानसात होती. मात्र दोन दिवसांपूर्वी परळीत झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंडे बहीण भावांचं ठरलं असल्याचं पाहायला मिळत आहे.
खासदारकी पंकजा मुंडे तर आमदारकी धनंजय मुंडेंकडे असं समीकरण चर्चिले जात आहे. मात्र आता जरी हे समीकरण चर्चेत असले तरी या दोघा बहीण भावांसमोर दुसरे कोणाचे आव्हान असणार तर ते नुकतेच राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या गटात राहिलेल्या बबन गित्ते यांचे.
दुसरीकडे काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख हे देखील इच्छुक असून ते आता मुंडे बहीण भावाच्या विरोधात असतील, हे मात्र निश्चित. आता इतर कोणते पक्ष बहीण भावाच्या विरोधात येणार, आणि त्यानंतर कशा पद्धतीने लढत होणार याच गोष्टीकडे आता बीड जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे.