सोलापूर : येथील अक्कलकोट रोड परिसरातील विविध नगारांमध्ये पाणी ड्रेनेज आणि रस्त्यांची वेगवेगळी विकास कामे महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहेत. मात्र ही कामे अर्धवट स्वरूपात करण्यात आल्याने याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ही कामे तातडीने पूर्ण करण्यात येऊन यासह विविध सोयी सुविधा नगरातील नागरिकांना उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी सोलापूर महापालिकेत मोर्चा स्वरूपात आलेल्या महिलांनी जनता दरबारात केली.
अक्कलकोट रस्त्यावरील तसेच एमआयडीसी परिसरातील अंबिका नगर, ईश्वर नगर, गंगा नगर, विश्वास नगर, तिरूपती नगर, कमलेश्वर नगर, हिमगिरी नगर भाग २-३, कामाक्षी नगर आदी नगरे असून या नगरांमधील नागरिक अनेक सुविधांपासून वंचित आहेत. या ठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र ही पाईपलाईन हिमगिरी नगरापर्यंतच येऊन काम अर्धवट राहिले आहे. अनेकवेळा महापालिकेत तक्रार करण्यात आली. नगरात नळ, ड्रेनेज व पोलची सुविधा करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आले. पण बजेट नसल्याचे सांगण्यात येते. आजपर्यंत ट्रॅक्टरव्दारे पाणीपुरवठा केला जातो. असे किती दिवस चालणार अशी विचारणा करत महिलांनी जनता दरबारात महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांचे लक्ष वेधून घेतले. या भागातील विविध विकास कामे तातडीने करण्यात यावीत अन्यथा महापालिकेवर मोर्चा आणण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी विविध नगारांमधील अंबिका देवकर, सुवर्णा विटकर, रेखा पवार, कमलाबाई पवार, आसमा शेख, मुमताज सय्यद, सविता बंदपट्टे, अन्नपूर्णा देशमुख, कमळाबाई मंजुळकर, महादेवी जाधव, अंबाबाई पवार, यल्लमा अलकुंटे, सुनिता बटोने, सुशाबाई केंगरे, वनमाला बंदपट्टे, लक्ष्मी शिंदे, सुनिता चौगुले आणि चंदा शिंदे आदी महिला उपस्थित होत्या.


















