वैराग – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या आत्मनिर्भर भारत या शेतीविषयी चर्चा सत्रामध्ये महाराष्ट्रातील दोन शेतकऱ्यांना आमंत्रित केले गेले होते, त्यापैकी एक जालना जिल्ह्यातील शेतकरी होते व दुसरे सुर्डी ता – बार्शी जिल्हा – सोलापूर येथील विजेता शेतकरी गटातील निमंत्रक धनाजी शेळके हे होते, दोन्ही शेतकऱ्यांनी पुणे ते दिल्ली असा विमानाने प्रवास केला, यासाठी केंद्र शासनाकडून त्यांच्या येण्या-जाण्याची सोय करण्यात आली होती.
यावेळी देशांमधील सर्व राज्यांचे कृषी विस्तार प्रमुख या मीटिंगसाठी उपस्थित होते, तसेच या बैठकीमध्ये मोदीजींनी भविष्यकाळामध्ये डाळींच्या बाबतीत भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प बोलून दाखवला.
यावेळी धनाजी शेळके यांच्यासोबत तूर या पिकाबद्दल पंतप्रधानांनी सखोल चर्चा केली. धनाजी शेळके यांनी पाणी फाउंडेशन सोबत काम केल्यामुळे पाण्याच्या बाबतीत आणि शेतीच्या बाबतीत कसा फायदा झाला हे सांगितले व सुर्डी गावचा वॉटर कप ते फार्मर कपचा प्रवास त्यांनी सर्वांसमोर मांडला, तसेच पाणी फाउंडेशन व महाराष्ट्रातील विविध कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भरघोस उत्पन्न घेत आहोत हे धनाजी शेळके यांनी पंतप्रधानांना सांगितले.
यावेळी धनाजी शेळके यांच्याकडून वॉटर कप ते फार्मर कप प्रवासा दरम्यानचे काही व्हिडिओ पंतप्रधानांनी पाहिले आणि पाहून झाल्यानंतर त्यांना शाबासकी दिली तसेच सिने अभिनेते आमिर खान हे शेती चळवळीसाठी जे योगदान देत आहेत त्याबद्दल पंतप्रधानांनी आमिर खान आणि संपूर्ण पाणी फाउंडेशन टीमचे व महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांचे मनापासून कौतुक केले.


















