तभा फ्लॅश न्यूज/माहूर : माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना स्वातंत्र्याचे तब्बल ७८ वर्षे पूर्ण होत आले असतानाही रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत असून त्यांचे जीवाचे हाल थांबायला तयार नाही.
तालुक्यातील बहुतांश रस्त्यांचे तीन तेरा वाजल्याने अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचे भाग्य उजाळणार कधी? हा त्या भागातील जनतेचा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे.
तांदळा मार्गे इवळेश्वर या डोंगराळ ग्रामीण भागातील रस्त्याची झालेली दूरवस्था बघितल्यावर येत असून पावसाच्या पाण्यामुळे दलदलीचे स्वरूप येऊन सदरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून तूर्तास रहदारी योग्य रस्ता तयार करुन द्यावा , अन्यथा! सामुहिक जन आंदोलन करणार! असा खणखणीत इशारा तब्बल ०९ गावच्या सरपंचांनी एकाचवेळी एका संयुक्त निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाला दि.14 जुलै रोजी दिल्याने संबंधित प्रशासनासह खळबळ उडाली आहे.याची प्रतिलिपी आ. भीमराव केराम यांनीही दिली आहे.
माहूर तालुक्यातील अतिदुर्गम आणि एकेकाळच्या नक्षलग्रस्त ग्रामीण भागातील गावच्या नागरिकांना दळणवळणाची एकमेव सुविधा असलेला केरोळी फाटा ते गुंडवळ – तांदळा मार्ग इवळेश्वर असा जाणारा रस्ता जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्याकडे वर्ग करुन घेतला.मात्र ,सदरील रस्त्याचे पावसाळ्याचे दिड महिने लोटूनही अद्याप दूपदरीकरणासह मजबुतीकरण करण्यात आले नसल्याने रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर पायी चालणे देखील महाकठीण झालेले आहे.या मार्गावरील रस्त्यावरील पूले तुटली असून, रस्ता चिखलमय झाला आहे.सदर रस्त्याचे डांबरीकरचे काम मंजूर असून सध्या पावसाळ्यामुळे थांबले आहे.
परिणामी या भागातील रस्ते अनेक ठिकाणी पावसाळ्यामुळे किंवा इतर कारणांमुळे चिखलयुक्त (दलदलीचे) झाले आहेत. यामुळे लोकांना ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहेत.रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे किंवा खडी उखडल्यामुळे ते चिखलयुक्त झाल्याने लोकांना पायी चालणे, सायकल चालवणे, किंवा वाहन चालवणे कठीण कठीण झाले आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडचणी येत असल्याने शेतीची कामे वेळेवर होत नाहीत. तसेच या भागात आपात्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा इतर आवश्यक सेवा वेळेवर पोहोचू शकत नाहीत.वस्तूंची वाहतूक कमी झाल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असून या समस्येचे निराकरण करण्यासाठी रस्त्यांची नियमित दुरुस्ती आणि डांबरीकरण करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात पाणी निचरा होण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.स्थानिक संबंधित प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे.
या भागातील गावाच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे. या रस्त्यावरून चालताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. केरोळी फाटा ते गुंडवळ- तांदळा मार्गे इवळेश्वर,कुपटी हा मार्ग हल्ली खड्ड्यांचा मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर एवढे खड्डे पडले आहेत की, या मार्गावरून प्रवास करणे नागरिकांच्या नाकीनऊ येत आहे.या रस्त्यावर अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. यावरून या रस्त्यावर किती मोठ्या प्रमाणात खड्डे असेल, याचा सहज अंदाज बांधता येतो. रस्त्यांवरील खड्ड्यामुळे रस्ता अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यातील खड्डेच आता नागरिकांच्या जिवावर उठले आहे. या भागातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने हजारो खड्डे नागरिकांच्या जिवाला कारणीभूत ठरत आहेत. रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत असेल तर या देशातील नागरिकांचे सर्वात मोठे दुर्दैव कोणते, हा प्रश्न आता सामान्य नागरिकांनाच छळायला लागला आहे.
रस्ते देशाच्या विकासाचे प्रतिक आहेत.रस्त्यावरुन देशाच्या विकासाची संकल्पना ठरविली जाते.त्यात ग्रामीण भागाच्या विकासात रस्त्यांची भूमिका महत्त्वाची असते.
त्यामुळे या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींनीही लक्ष देणे तेवढेच गरजेचे असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने दुपदरीकरण व डांबरीकरण होईल मात्र तुर्तास तात्पुरती सोय म्हणून केरोळी फाटा ते गुंडवळ- तांदळा मार्गे इवळेश्वर कुपटी या नादुरुस्त रस्त्याची दुरूस्ती करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने जनआंदोलन करण्याचा इशारा,नागरिकांसह तब्बल ०९ गावातील सरपंचांनी एकाचवेळी एका संयुक्त निवेदनाद्वारे आपल्या स्वाक्षरीने सार्वजनिक बांधकाम विभाग, माहूरला दिला आहे.
या निवेदनावर सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष (लखमापूर )गणेश राठोड, सौ. दुर्गा संतोष जाधव (तांदळा), रामेश्वर किसन जाधव (गुंडवळ),प्रविका इंदल राठोड (पवनाळा), वंदना दुधराम राठोड (ईवळेश्वर ),सुभाष किसन आडे (महादापूर), गजानन रमेश राठोड (बोरवाडी), प्रफुल बंडू भुसारे (कुपटी),सौ.सुलोचना अर्जुन पवार( दत्तमांजरी) या सरपंचांसह संतोष जाधव, विठ्ठल प्रेमसिंग राठोड, गजानन किसन कऱ्हाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.