करमाळा – पत्रकारांनी समाजातील जागृतीसाठी लेखणीचा उपयोग करून समाज कल्याणासाठी सातत्याने कार्यरत राहावे, तसेच पत्रकारांच्या सर्वांगीण कल्याणासाठी सावंत गट सदैव कार्यरत राहून त्यांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत यांनी केले.
पत्रकार दिनानिमित्त करमाळा शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा सावंत गट व करमाळा शहर विकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास नगरसेवक संजय उर्फ पप्पू सावंत, माजी पंचायत समिती सदस्य ॲड. राहुल सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि सन्मानपूर्वक पार पडला.
यावेळी बोलताना सुनील बापू सावंत म्हणाले की, पत्रकार हा समाज घडवणारा महत्त्वाचा घटक आहे. सावंत गटाच्या यशामध्ये पत्रकार बंधूंचा मोठा वाटा असून त्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे विकासकामे जनतेपर्यंत पोहोचू शकली. त्यांनी पत्रकार बांधवांसाठी स्वतंत्र पत्रकार भवन उभारण्याचा मानस यावेळी जाहीर केला.
करमाळा शहर व तालुक्याच्या विकासासाठी युवक आणि पत्रकारांनी दिलेल्या सूचना सकारात्मक दृष्टीने स्वीकारून शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काम केले जाईल, अशीही त्यांनी घोषणा केली. आगामी काळात सुरू असलेल्या विकासकामांचे वस्तुनिष्ठ वार्तांकन करून जनतेसमोर मांडावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास नगरसेवक प्रतिनिधी सुनील लुणिया, अमोल परदेशी, हुमरान मुलाणी, नगरसेवक रवी जाधव दादासाहेब इंदलकर संदीप कांबळे पप्पू ओहोळ यांची उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ पत्रकार ॲड. बाबुराव हिरडे, नासीर कबीर, विवेक येवले, आशपाक सय्यद, दिनेश मडके, जयंत दळवी, सचिन जव्हेरी अशोक मुरूमकर, शितलकुमार मोटे, अलीम शेख, प्रा. राजेश गायकवाड, विशाल घोलप, सुनील भोसले, प्रवीण अवचर, शेखर स्वामी, संजय चौगुले, हर्षवर्धन गाडे,तुषार जाधव, समाधान फडतरे, प्रफुल दामोदरे, विशाल परदेशी, संजय कुलकर्णी, नागेश चेंडगे,आयुब शेख, उमेश पवळ उपस्थित होते.
ज्येष्ठ पत्रकार ॲड. बाबुराव हिरडे यांनी मनोगत व्यक्त करत सांगितले की, सावंत गटाने नगरपालिका निवडणुकीत मिळवलेले यश हे सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या प्रस्थापित पक्षांचे मातब्बर प्रतिस्पर्धी असतानाही केवळ जनतेच्या विश्वासावर हा विजय मिळवण्यात आला. हा विजय भविष्यातील राजकारणाची नांदी ठरणार असून सावंत गटाच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी पाया रचेल. त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी विकासाभिमुख कार्य सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले यांनी मनोगत व्यक्त करत सांगितले की, सावंत गटाला गल्ली बोळातला गट म्हणणाऱ्यांना जनतेने आपली जागा दाखवून दिली असून गटाचे यश विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे. त्यामुळे करमाळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जबाबदारीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. तर ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर यांनी सावंत गटाच्या कार्याचा लेखाजोखा मांडत त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी सांगितले की, सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी राहून कार्यतत्पर राहिल्यामुळेच जनता गटाच्या पाठीशी आहे आणि करमाळा शहराच्या विकासात गट प्रभावी भूमिका बजावेल.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विनोद महानवर, बापु उबाळे, सागर सामसे, पांडुरंग घोगरे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक ॲड. राहुल सावंत यांनी केले, सूत्रसंचलन देवा लोंढे यांनी तर आभार नगरसेवक संजय उर्फ पप्पू सावंत यांनी मानले.

















