वेळापूर – येथील गरुड बंगला येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये निवडून आलेले नूतन जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील व वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांच्या वतीने माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर व वेळापूरच्या नूतन पंचायत समिती सदस्या विमलताई जानकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आमदार उत्तमराव जानकर परिवाराच्या वतीने नूतन जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील व नूतन पंचायत समिती सदस्या वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित बोरकर, मगन काळे, राष्ट्रवादीचे नेते जीवन जानकर, अमोल पनासे, रामचंद्र काळे, हनमंत पाटील, कैलास इंगळे, राहुल मदने, सचिन शेंडगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार उत्तमराव जानकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना उद्धव ठाकरे, शिवसेना शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व मित्र पक्षांनी एकत्रितपणे लढवून मोठे यश संपादन केले. “हा विजय केवळ व्यक्तींचा नसून माळशिरस तालुक्यातील जनतेच्या विश्वासाचा आणि एकजुटीचा आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देण्यासाठी सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी प्रामाणिकपणे काम करतील,” असे ते म्हणाले.























