मुंबई – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाला दिलासा देणारी बाब घडली आहे. त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह तुतारीशी साधर्म्य असलेले ‘पिपाणी (ट्रम्पेट)’ चिन्हावर निवडणूक आयोगाने कायमची फुली मारली आहे. म्हणजे ते कायमचे रद्दबादल करून अपक्ष उमेदवारांना हे चिन्ह न देण्याचा निर्णय घेतला आहे.
या चिन्हामुळे लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला मोठा दणका बसला होता. दोन्ही चिन्हातील साधर्म्यामुळे लोकसभेला दोन ठिकाणी तर विधानसभेला 9 जागावर पराभव पत्करावा लागल्याचं दावा त्यांच्याकडून करण्यात येत होता आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र त्यांना त्याचा फटका बसणार नाही.
दरम्यान,पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी निवडणूक आयोगाला शेवटी उशिरा सुचलेले शहाणपण,असे म्हणत या निर्णयाचे स्वागत केले आहे.
शरद पवार गटाकडून लोकसभा व विधानसभा निवडणुकांवेळी ‘पिपाणी’ चिन्ह रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यावेळी आयोगाने त्याला नकार दिला होता. या चिन्हामुळे अनेक मतदारांना भ्रम निर्माण झाला होता. काही मतदारांनी एकाच नावाच्या किंवा साधर्म्य असलेल्या चिन्हांच्या उमेदवारांना मतदान केल्याने, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा नुकसान झाले होते. आता
निवडणूक आयोगाने दिलेल्या निवेदनात “मतदारांची दिशाभूल होऊ नये, म्हणून साधर्म्य असलेली चिन्हे टप्प्याटप्प्याने वगळण्यात येत आहेत. निवडणुकीत प्रत्येक मतदाराला स्पष्ट पर्याय मिळण्यासाठी आयोगाचं प्राधान्य असल्याचे म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने आपल्या १९४ मुक्त चिन्हांच्या यादीतून पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वगळले आहे.
अपक्षांकडून पिपाणी चिन्हाची मागणी
लाेकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघात पिपाणी चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवाराला मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्यामुळे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पराभव पत्करावा लागला होता.तर
विधानसभा निवडणुकीत अपक्षांकडून पिपाणी चिन्हाची मागणी करण्यात आली होती. विशेषत: शिरूर, बारामती, सातारा, भिवंडी, दिंडशेरी, रावेर, अहिल्यानगर, बीड या मतदारसंघात पिपाणीला पसंती मिळाली होती. त्याचप्रमाणे जिंतूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव, पारनेर, केज, परांडा या मतदारसंघांत शरद पवारांच्या पक्षाचा उमेदवार जितक्या मतांनी पाराभूत झाला. त्यापेक्षा अधिक मते पिपाणी चिन्ह असलेल्या अपक्षा उमेदवारांना मिळाली होती. ही मते विभाजित झाली नसती तर शरद पवारांच्या पक्षाचे १९ आमदार निवडून आले असते, असा दावा करण्यात आला होता.

















