तभा फ्लॅश न्यूज//वाशी : राज्यभर राबविण्यात येत असलेल्या वृक्ष लागवड चळवळीला व्यापक प्रतिसाद मिळत असून, यामध्ये आता आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारानेही योगदान दिले आहे. वाशी तालुक्यातील तेरखेडा गावात आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने वनविभागाच्या जागेवर १०० झाडांची यशस्वी लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, या झाडांचे संगोपन पुढील तीन वर्षे आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारच करणार आहे.
ही वृक्षलागवड ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या राज्य शासनाच्या अभियानाचा एक भाग असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या १० कोटी वृक्ष लागवड मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा प्रशासनाकडून ‘हरित धाराशिव’ हे विशेष अभियान १९ जुलै रोजी मोठ्या उत्साहात राबविण्यात आले.
या उपक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराने जंगली व औषधी झाडांची निवड करत १०० झाडांची लागवड केली. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने ही महत्त्वाची पावले असल्याचे मानले जात आहे. याप्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंगचे भोसले सर, गोमारे सर, ॲड. कोळपे, गावचे सरपंच दिलीप घोलप, उपसरपंच कलाम पठाण, माजी सरपंच बालाजी घुले, उद्योजक तय्यब दारूवाले, संजय बोराण, अशोक गपाट, ढोले सर आदी मान्यवर उपस्थित होते.
‘एक पेड माँ के नाम’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील अभियानास हातभार लावत आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराने सामाजिक जबाबदारीचे भान जपत पर्यावरण रक्षणाचा एक प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.