बार्शी – येथील पोदार लर्न स्कूल, बार्शी येथे शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, गायन, नाट्यछटा व समूहगीतांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला. शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ घेऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रसाद मिरकले म्हणाले की, शाळा ही शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची पवित्र भूमी आहे. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमधील कला क्रीडा व संस्कारांचे सुंदर दर्शन घडत आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. समरेंद्र पाणीग्रही
म्हणाले की, शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून संस्कार, कला, क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकासाचे पवित्र मंदिर आहे. प्रमुखा अतिथी बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अशोक सायकर म्हणाले की, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच खरे शिक्षण असून हेच या कार्यक्रमातून दिसून येते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूरचे डीसीपी श्री. विजय कबाडे म्हणाले की, कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नेतृत्व गुण विकसित होतात व देशाचा भावी सुजाण नागरिक निर्माण होतो. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. वैशाली कबाडे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी दाखवलेली कला, संस्कृती व क्रीडा कार्यक्रम त्यांच्या प्रतिभेचे दर्शन घडवतात. संस्थेचे सचिव श्री संदीप बर्डे म्हणाले की, सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सन्मान, नीतिमत्ता, सहकार्य या गुणांची वाढ होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. रविराज बेलुरे म्हणाले की, शाळा हे विद्यार्थ्यांमधील प्रतिभा आणि व्यक्तिमत्व विकास ओळखण्याचे प्रतीक आहे. सांस्कृतिक कार्यक्रम हे विद्यार्थ्यांमधील कला, गुण, मेहनत आणि आत्मविश्वास यांचे दर्शन घडवतात. यावेळी उपस्थित तहसीलदार श्री शेख, श्री. अमित गांगजी, श्री. अमित पटेल व पालकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले.
शिक्षकवृंदाच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
















