मंगळवेढा – शहरातील भाजी मंडईच्या कट्टयावर बसून कल्याण नावाचा मटका जुगार घेत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून 5,360 रुपये रोख रक्कम जप्त करून नईम सिरारोद्दीन खतीब वय 57,मालक अभिजीत गणपत घुले या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी दि.30 रोजी पोलिस निरिक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर बीटचे पोलिस हवालदार दत्तात्रय व्हरे व अन्य पोलिस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना शहरातील भाजी मंडईत एका कट्टयावर एक इसम रस्त्याने येणार्या जाणार्या लोकांकडून अंदाजे येणार्या अंक आकडयावर पैसे घेवून कल्याण मटका नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यावर सदर ठिकाणी 5.45 वाजता पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी एक इसम कट्टयावर बसून आकडेमोड करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.पोलिसांनी नईम खतीब यास ताब्यात घेवून जुगार खेळून आलेली रोख रक्कम कोणास देतो व कोणाच्या सांगण्यावरून जुगाराची रक्कम घेतो असे विचारले असता त्याने मालक अभिजीत गणपत घुले यांचे सांगण्यावरून घेत असल्याचे सांगितले असल्याचे पोलिस अंमलदार विनायक जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.दरम्यान,स्थानिक ग्रामपंचायत जागरूक लोकप्रतिनिधी यांनी मंगळवेढा शहरात बोकाळलेल्या अवैध धंदयाबाबत कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचेकडे लेखी तक्रार केल्याने सदरची कारवाई तात्काळ दखल घेवून करण्यात आली आहे.भविष्यातही अशाच कारवाई होवून गोरगरीबांचे संसार बेचिराख करणार्या अवैध व्यवसायिकांवर कारवाईचे सत्र सुरुच ठेवावे असाही सूर पुढे येत आहे.येथे पोलिस उपविभागीय अधिकारी दर्जाचे अधिकारी असतानाही अवैध धंदयाच्या कारवाईसाठी अद्यापतरी पथके नेमली नसल्यामुळे अवैध धंदयाला सुळसुळाट वाढला असल्याच्या तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पथके नेमून पोलिस अधिकार्यांनी अवैध व्यवसायावर आपला अंकुश ठेवावा अन्यथा अवैध व्यवसायिक मुजोर होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.





















