नायगांव / नांदेड – तालुक्यातील तलबीड शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर नायगाव पोलिसांनी अचानक धाड टाकत अंदर–बाहेर जुगार खेळणाऱ्या १२ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत १ लाख ८ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम, ९ मोबाईल फोन व ५ मोटारसायकलींसह एकूण ६ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. तर आज दि.२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रानसुगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर व्यंकटराव जाधव यांच्या तलबीडजवळील शेतात मोकळ्या जागेत जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांना मिळताच पोलिसांनी तातडीने पथक तयार करून दोन पंचांच्या उपस्थितीत नियोजनबद्ध धाड टाकली.
धाडीवेळी अविनाश प्रकाश माचनवाड (रा. हंगरगा, ता. उमरी), शंकर गणपती देवडे (इतवारा, नांदेड), हनुमंत गंगाधर वानखेडे (रा. सावरखेड), नागोराव आनंदा गायकवाड (रा. सावरखेड), संजय शंकर बाणेवाड (रा. घुंगराळा) व गणेश बालाजी पवळे (रा. कोपरा, ता. नायगाव) शेख खादीर दस्तगीर (रा. घुंगराळा), गणपती गोविंदराव जाधव (रा. सुगाव), भगवान गणपती ढगे (रा. सावरखेड), माधव कोंडीबा सुगावे (रा. घुंगराळा), साईनाथ बाबू गायकवाड (रा. सावरखेड), माणिका बळी वानखेडे (रा. सावरखेड) हे १२ जण जुगार खेळताना आढळून आले.
पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन व दुचाकी असा मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी बालाजी बळवंतराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या धाडशी कारवाईत बिलोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्याम पानेगावकर, पोउपनि गजानन तोटेवाड, पोउपनि सुरज तिडके, पो.हे कॉ. मुद्देमवार, भगवान कोतापल्ले, सुदाम जाकोरे, पो.काॅ गजानन चापलकर, विनोद भंडारे, गाजुलवार, अंभोरे, ममताबादे, बालाजी शिंदे उपस्थित होते. या कारवाईमुळे तालुक्यात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांना जोरदार धक्का बसला असून पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे जुगार चालकांचे धाबे दणाणले आहेत.


























