जालना / बदनापूर – बदनापूर पोलिस व महसूल विभागाने सायगाव शिवारातील दुधना नदी पात्रामध्ये सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर संयुक्त कारवाई करत तब्बल ₹४५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन टिपर वाहने जप्त करण्यात आली असून, जेसीबी चालक मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.
दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री सायगाव परिसरात दुधना नदी पात्रामध्ये काही लोक अवैधपणे वाळू उपसा करत असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांना मिळाल्यानंतर तात्काळ पोलिस पथक रवाना करण्यात आले. महसूल विभागातील तलाठी सौ. सुनीता मदनसिंग नागलोत यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला.
पथकाने सायगाव शिवारात छापा टाकला असता आरोपी जेसीबीच्या सहाय्याने वाळू भरून टिपरमध्ये चोरटी वाहतूक करताना दिसले. पोलिस पाहताच आरोपींनी घाईघाईने वाळू खाली करून वाहनांसह पळ काढला. मात्र पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करून दोन टिपर ताब्यात घेतले, तर जेसीबी घटनास्थळावरून फरार झाला.

या प्रकरणात आरोपी —
1.गजानन संपत उगले, रा. कुंभारी
- समाधान अशोक उगले, रा. कुंभारी
- गणेश काकडे, रा. ढवलेशोर
यांच्याविरुद्ध तलाठी सौ. नागलोत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अजयकुमार बंसल (पोलीस अधीक्षक, जालना), आयुष नोपानी (अप्पर पोलीस अधीक्षक), आणि अनंत कुलकर्णी (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे, स.फौ. बाबासाहेब जऱ्हाड, पोहेकॉ अंकुश दासर, पोका परमेश्वर धुमाळ, पोका अर्जुन परळकर, तसेच चालक ग्रेड पोउपनि कुंटे यांनी परिश्रम घेतले.
या कारवाईमुळे बदनापूर परिसरातील अवैध वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे कौतुक केले जात आहे.


















