पोलिस बंदोबस्तात आज अखेर पवईमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा मारण्यात आला. जवळपास १२ हजार चौरस फुटावरील बांधकामे या कारवाईत हटवण्यात आली. यावेळी १५० पोलीस तैनात करण्यात आले होते. तर २५ इंजिनीअर आणि ३०० कामगार उपस्थित होते.
पवईतील वईगाव व मौजे तिरंदाज गाव येथील भूखंडावर ५०० झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. या झोपड्यांवर कारवाई करावी, असे निर्देश महानगरपालिका प्रशासनास देण्यात आले होते. या झोपडपट्टी वासियांना १ जून रोजी कायदेशीर नोटीस बजाविण्यात आली होती.
दरम्यान, पवईतल्या परिसरामध्ये पालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुरू असताना पालिका कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेत १० ते १५ पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले होते.
काय आहे प्रकरण?
२००५ साली पवईतील जय भीमनगर परिसरात कामगारांना तात्पुरता ट्रान्झिस्ट कॅम्प तयार करण्याची परवानगी देण्यात आली होती. नंतरच्या काळात याठिकाणी झोपड्यांची मोठी वसाहत निर्माण झाली. ही जागा शासकीय वसाहतीसाठी राखीव असल्याने पालिकेने अनेकदा याठिकाणी अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवेळी हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. आजदेखील पालिकेचे पथक पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन अतिक्रमण पाडण्यासाठी याठिकाणी आले होते. मात्र, पालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या प्रचंड रोषाचा सामना करावा लागला. स्थानिक नागरिकांनी वस्तीच्या तोंडावर उभे राहून पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांची वाट रोखून धरली. पालिका अधिकाऱ्यांनी पुढे येण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्थानिक रहिवाशांनी दगडांचा तुफान मारा सुरु केला. पोलिसांनी त्यांच्याकडे असणाऱ्या फायबरच्या ढालींनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दगडफेक इतकी जोरात झाली की, यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले आहेत.