तभा फ्लॅश न्यूज/माहूर : पोलिस निरीक्षक गणेश कराड यांनी शहरातील बौद्ध पुरा परिसरात घरासमोरील अंगणात सार्वजनिक ठिकाणी जुगार अड्ड्यावर धाड टाकून विनापरवाना झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत व खेळवीत असलेल्या नऊ जणांना ताब्यात घेत त्यांचेकडून 15 हजार 630 रुपयांची नगदी रोकड व जुगार साहित्यासह मुद्देमाल जप्त केल्याची खळबळजनक कारवाईची घटना सुमारास घडली आहे.
माहूर पोलिस ठाण्यात आजवर ड्युटी बजावलेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांपैकी आपल्या धाडसी कारवायांमुळे अवैध धंद्यांवर अंकुश लावत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात यशस्वी ठरलेल्या काही मोजक्या पोलिस अधिकाऱ्यांपैकी पोलीस निरीक्षक गणेश कराड हे अल्पावधीतच जनतेच्या दृष्टीकोनातून एक सिंघम पोलिस अधिकारी ठरले असून,सध्या करत असलेल्या एकामागून एक अशा धाडसी कारवायांमुळे ते कमालीचे ॲक्टिव्ह ॲन्ड ॲक्शन मोडवर असल्याचे दिसून येत आहेत.
याच कडीत त्यांनी शहरातील वार्ड क्रमांक 13 मधील बौद्धपुरा परिसरात घरासमोरील अंगणात सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना स्थानिकचे 9 आरोपीतांना नगदी 15 हजार 630 रुपये व जुगाराचे साहित्यासह रंगेहाथ पकडले.
या 9 आरोपीतांना ताब्यात घेत माहूर पोलिसांनी त्यांचे विरुद्ध गुन्हा महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे पोलिस कॉन्स्टेबल गजानन देविदास जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या आदेशाने गुन्हा नोंद केला असून, सर्व आरोपींना पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे. या छापा कारवाईचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गजानन चौधरी यांच्या कडे देण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक गणेश कराड, सपोनि पालसिंग ब्राह्मण, सपोनि संदीप अन्येबोईनवाड, पोहेका गजानन चौधरी, पोहेका प्रकाश गेडाम, पोहेका कैलास जाधव, पवन राऊत, ज्ञानेश्वर खंदाडे, चालक जाधव यांनी कामगिरी बजावली.
पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी माहूर ठाण्यात रुजू होताच 14 जून पासून आजपर्यंत अल्पावधीतच अवैध देशी दारू विक्री, अवैध हातभट्टी दारु विक्री, अवैध वाळू चोरी यासह अवैध विनापरवाना मटका जुगार अड्ड्यावर छापे अशा जबरदस्त कारवाया करत आरोपींवर गुन्हे दाखल करत मोठ्या प्रमाणात नगदी रक्कमेसह विविध मुद्देमाल जप्त केला आहे. यासाठी ते खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत,मात्र शहरासह परिसरात सुरू असलेल्या अवैध गुटखा साठवणूक स्थळे व विक्रीवर देखील त्यांच्याकडून अशाच प्रकारच्या धडाकेबाज कारवाईची अपेक्षा पोलिस प्रशासनावर विश्वास असलेल्या कायदाप्रेमी नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.