बार्शी – कोरफळे येथील शेतकरी किरण बरडे यांच्या द्राक्षबागेचे नुकसान हे त्याच्या मालमत्तेचे नुकसान आहे. त्यांचे जीवनमान त्याच्यावर आहे. त्यामुळे पोलिसांनी याची दखलपात्र म्हणून नोंद घेवून याचा तपास करावा, असे वक्तव्य आमदार दिलीप सोपल यांनी केले.
ऑक्टोबर छाटणी झाल्यानंतर फलधारणेच्या मोसममध्ये कोरफळे येथील शेतकरी किरण बरडे यांच्या द्राक्षबागेवर अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास तणनाशक फवारले. त्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर आमदार दिलीप सोपल बोलत होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर देखील त्यांच्यासमवेत होते.
आमदार सोपल म्हणाले, बरडे हा अत्यंत मेहनती शेतकरी असून त्यांची १ एकर द्राक्षबाग आहे. घरातील तीन व्यक्ती यात खूप मेहनत घेत होते. या बागेवर तणनाशकाची फवारणी केल्यामुळे किरण बरडे या शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्यांनी कोणी हे कृत्य केले अशा नीच प्रवृत्तीला कोणीही पाठीशी घालता कामा नये. अशा गोष्टीचा निषेधच केला पाहिजे. पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता याचा तपास करावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.


















