बिलोली – राज्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून, बिलोली पोलिसांनी सगरोळी ते नरसी रोडवर धाडसी कारवाई केली आहे. या कारवाईत विनापरवाना रेती वाहतूक करणारा हायवा टिप्पर पकडण्यात आला असून, एकूण ४० लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नांदेडचे पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुषंगाने बिलोली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती कमल शिंदे व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. ५ फेब्रुवारी रोजी रात्री १०:२५ च्या सुमारास सगरोळी ते नरसी रोडवरील अतिथी बार जवळ एक संशयास्पद हायवा टिप्पर (क्र. MH 55 C 9000) येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यात सुमारे ०७ ब्रास रेती मिळून आली.
वाहनचालकाकडे रेती वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी ४० लाख रुपये किमतीचा हायवा आणि ३५ हजार रुपयांची रेती असा एकूण ४०,३५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी वाहनचालक रविंद्र फुलसिंग पवार (वय ३२ वर्षे, रा. रामन तांडा महाडोणगाव, ता. औराद जि. बिटर) याला ताब्यात घेण्यात आले असून, बिलोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) व ३ (५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरख, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कमल शिंदे, पोउपनि सुरजकुमार तिडके, पोहेकॉ मुदेमवार, पोलीस अंमलदार आंबुरे व धुपतवाड यांच्या पथकाने केली. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी बिलोली पोलीस पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
























