—– —- —–
कार्यकारी अभियंता नांदेड यांच्याकडे तक्रार,वझरगा येथील प्रकार
—- —
देगलूर प्रतिनिधी
वझरगा ता. देगलूर येथील शैक्षणिक मंदिर समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते माणिक सूर्यवंशी यांनी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दोन खोली शाळेच्या बांधकामात अत्यंत निकृष्टता होत असल्याबाबतचे सज्जड पुरावे माणिक सूर्यवंशी यांनी एकत्रित करून देगलूर येथील जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांच्याकडे तक्रार दिली होती
मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जाणून बुजून अर्थपूर्ण दुर्लक्ष करून तक्रारीस केराची टोपली दाखवली.
सदरील दोन खोली शाळेचे बांधकाम हे डीपीडीसी अंतर्गत होत असून सामाजिक कार्यकर्ते माणिक सूर्यवंशी यांनी काम चालू असतानाच निकृष्टते बाबतचे पुरावे संबंधितांना कळवली होती. ज्ञानदानाच्या या मंदिरात कदापी भ्रष्टाचार होऊ देणार नाही म्हणून माणिक सूर्यवंशी यांनी संबंधित कामाची तक्रार वरिष्ठांकडे दिली. खरे पाहता वरिष्ठांनी ज्ञानदानाच्या मंदिरात होणाऱ्या या भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर पावले उचलायला हवी होती
अशी भावना माणिक सूर्यवंशी यांनी व्यक्त केली. मात्र कोणतीच कठोर पावले उचलली गेली नसल्याने सूर्यवंशी यांनी थेट नांदेड गाठून कार्यकारी अभियंता नांदेड यांच्याकडे तक्रार दिली ज्यामध्ये दोषपूर्ण कार्य करणारे
संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायदा २००६ कलम १० व उपकलम १,२,३ नुसार शिस्तभंगाची कारवाई करावी व बोगस काम करणाऱ्या कंञाटदाराला काळ्य यादीत टाकून यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते माणिक सूर्यवंशी यांनी नांदेड जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.