सोलापूर – प्रज्ञा बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र राज्य तर्फे देण्यात येणारा प्रज्ञा साहित्य प्रेरणा पुरस्कार-२०२६ ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे उपाध्यक्ष खाजाभाई बशीर बागवान यांच्या समीक्षण ग्रंथाला जाहीर झाला आहे. त्यांच्या “सांस्कृतिक सावल्या.. मागोवा मुस्लिम मराठी स्त्री साहित्याचा” या पुस्तकाला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळणार आहे. संस्थेच्या अध्यक्षा लीना देगलूरकर यांनी ही माहिती दिली. नागपूर येथे संपन्न होणाऱ्या साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
खाजाभाई बशीर बागवान यांच्या कार्याचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे सचिव अय्युब नल्लामंदू, उपाध्यक्ष प्रा. डॉ. इ. जा. तांबोळी, ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे संस्थापक शफी बोल्डेकर तसेच सहसचिव अनिसासिकंदर यांनी त्यांचे अभिनंदन केले. “सांस्कृतिक सावल्या” या ग्रंथात मुस्लिम मराठी स्त्री साहित्याचा मागोवा घेतला असून, त्यातून सामाजिक-सांस्कृतिक संदर्भांची सखोल चिकित्सा केली आहे. या अभ्यासामुळे मराठी साहित्य क्षेत्रात नवा दृष्टिकोन निर्माण झाला आहे.


























