बार्शी – पत्रकार दिनानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या बार्शी सेवाकेंद्रातर्फे आयोजित स्नेहमिलन कार्यक्रम राजयोग भवनात शनिवारी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत शांत आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमात राजयोग ध्यान आणि योगगीताने सुरुवात झाली, ज्यात उपस्थित पत्रकारांनी अंतःशांतीचा अनुभव घेतला.
सेवाकेंद्र संचालिका राजयोगिनी ब्र. संगीतादीदी यांनी मार्गदर्शन करताना म्हणाल्या, ‘हा ईश्वरीय दरबार असून, येथे शांती आणि शक्तीचा खजिना मिळतो. प्रसारमाध्यमांचा समाजकार्यातील वाटा अमूल्य आहे.’ त्यांनी बार्शी पत्रकारांच्या सकारात्मक योगदानाचे माउंट आबू आणि इतर केंद्रांवर होणारे कौतुक नमूद केले.
केअरटेकर मोहनभाई यांनी सेवाकेंद्राचा इतिहास सांगितला. १८ जानेवारी १९७६ पासून सुरु झालेल्या या सेवेचा आज वटवृक्ष झाला आहे. सुरुवातीच्या अडचणी, टीका असूनही संयम आणि निष्ठेने कार्य विस्तारले, असे ते म्हणाले. त्यांनी तुलना, टीका आणि अहंकारापासून मुक्त राहून सेवा करण्याचे महत्त्व पटवले आणि सर्वांना नि:शुल्क राजयोग अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आवाहन केले.
प्रेरक वक्त्या ब्र. अनितादीदी करवा यांनी जीवनोपयोगी मार्गदर्शन केले. सफल जीवनासाठी चढ-उतार आवश्यक आहेत. ब्रह्माकुमारी ज्ञान म्हणजे जीवन जगण्याची कला, तर योग म्हणजे सर्वांच्या कल्याणाची भावना, असे त्या म्हणाल्या. त्यांनी गाईडेड मेडिटेशन घेतले, ज्यात पत्रकारांनी तणावमुक्ती आणि शांती अनुभवली.
पत्रकारांच्या मनोगतात पत्रकार सचिन अपसिंगकर यांनी संगीतादीदी, निशादीदी, मोहनभाई आणि अनितादीदींच्या सेवेचे कौतुक करत ब्रह्माकुमारी कार्याला समाज परिवर्तनाची शक्ती म्हटले. शेळके म्हणाले, पन्नास वर्षांत पन्नास हजारांहून अधिक लोकांचे जीवन सकारात्मक झाले. भूषण देवकर यांनी पीस ऑफ माइंड चॅनेलद्वारे दररोज राजयोग करत असल्याचे सांगितले.
डॉ. प्रणोती कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमात ३५ पत्रकार उपस्थित होते. शेवटी सर्वांचा सुविचारदर्शिका आणि प्रसाद देऊन सन्मान झाला. हा कार्यक्रम केवळ स्नेहमिलन न राहता मनःशांती आणि आध्यात्मिक प्रेरणेचा ठरला.
























