बार्शी – आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या बळावर बार्शीतील प्रतिक स्मिता मुकुंद आगरकर याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा नागरी परीक्षा २०२४ मध्ये नेत्रदीपक यश संपादन केले आहे. प्रतिकने ऑल महाराष्ट्रमध्ये ५१ वी रँक मिळवून बार्शी शहराचे नाव राज्यभर उज्वल केले आहे. विशेष म्हणजे प्रतिकने हे यश कोणत्याही अभ्यासिका किंवा क्लासचा आधार न घेता, केवळ स्वतःच्या घरी राहून सातत्याने अभ्यास करत प्राप्त केले. तर प्रतिकचे हे यश केवळ ५१ व्या रँकमुळेच नव्हे, तर त्याच्या यापूर्वीच्या कामगिरीमुळेही विशेष ठरते.
प्रतिकची यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यकर निरीक्षक (STI) २०२३, सहायक कक्ष अधिकारी (ASO) २०२३ आणि राज्यकर निरीक्षक (STI) २०२४ या पदांसाठीही निवड झाली होती. एकाच वेळी चार महत्त्वाच्या शासकीय पदांसाठी निवड होणे, हे प्रतिकच्या अभ्यासाची अचूक दिशा आणि कठोर परिश्रमाचे द्योतक आहे.
बार्शीत राहून, कोणत्याही मोठ्या शहराचा आधार न घेता प्रतिकने मिळवलेले हे यश, ग्रामीण भागातील आणि आर्थिक परिस्थितीमुळे मोठ्या शहरात जाऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा प्रेरणास्रोत आहे. प्रतिकच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत असून, भावी प्रशासकीय सेवेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
















