बार्शी – नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि ४१ नगरसेवकपदाच्या जागांसाठी २ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी रविवार दि. २१ रोजी होणार आहे. यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना गुरुवार दि. १८ रोजी नगरपरिषदेच्या भाऊसाहेब झाडबुके सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तैमुर मुलाणी यांच्यासह तहसीलदार एफ. आर. शेख, उप मुख्याधिकारी राजाराम नरुटे उपस्थित होते.
बार्शी नगरपरिषदेत ४२ जागापैकी ४१ नगरसेवक निवडून येणार आहेत. प्रभाग ७ मधून यापूर्वीच भाजपच्या नगरसेविका बिनविरोध निवडून आल्या आहेत..
११२ मतदान केंद्रातील मतमोजणी शासकीय धान्य गोदाम येथे उद्या रविवार दि. २१ सकाळी १० वाजल्यापासून सुरु होणार आहे. त्यासाठी १२ टेबलाच्या माध्यमातून ११ फेऱ्यात मतमोजणी पार पडणार आहे. मतमोजणी केंद्राच्या आत २० पोलिसांसह ८० अधिकारी, कर्मचारी नियुक्त केल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तैमूर मुलाणी यांनी सांगितले.
मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुरुवारी नगरपरिषदेच्या भाऊसाहेब झाडबुके सभागृहात तहसीलदार एफ. आर. शेख आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तैमूर मुलाणी यांनी मार्गदर्शन केले.
बार्शी शहरात २१ प्रभागातून ११२ मतदान केंद्रामधून ६३.२४ टक्के मतदान झाले होते. शहरात निकालाची प्रचंड मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. रविवार दुपारपर्यंत सर्व जागेचे निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे.



















