मुंबई : सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पवित्र छत्रछायेखाली 78 वा वार्षिक निरंकारी संत समागम 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2025 दरम्यान संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे अद्भुत दिव्यता आणि भव्यतेने साजरा होणार आहे. या आत्मीयतेच्या उत्सवात देश-विदेशातून असंख्य श्रद्धाळू सहभागी होऊन आनंदाचा आणि आध्यात्मिक अनुभवाचा लाभ घेणार आहेत. हजारो श्रद्धाळू भक्तगण आपल्या आपल्या क्षेत्रांतून येऊन संपूर्ण तन्मयता आणि समर्पण भावनेने दिवस-रात्र सेवेत गुंतलेले आहेत ज्यामध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील सेवादारही आपले महत्वपूर्ण योगदान देत आहेत. श्रद्धाळू सेवादारांच्या निरंतर सेवांमुळे या आयोजनाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
हा समागम केवळ एक धार्मिक किंवा वार्षिक आयोजन नसून ज्ञान, प्रेम आणि भक्तीचा असा पवित्र संगम आहे, जो ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून आत्म्याला परमात्म्याशी जोडतो. येथे श्रद्धाळू आध्यात्मिक जागृती समवेत मानवता, विश्वबंधुत्व आणि परस्पर-प्रेम या भावनाही आत्मसात करतात. हे आयोजन ‘आत्ममंथना’ची ती दिव्य भूमी आहे, जिथे प्रत्येक साधक आपल्या अंतर्मनात डोकावतो, आत्मचिंतन करतो आणि आपल्या आत्मिक चेतनेला जागृत करण्याची प्रेरणा प्राप्त करतो.
हे संपूर्ण आयोजन सतगुरु माताजींच्या दिव्य प्रेरणा आणि आशीर्वादाने पार पडत आहे. सतगुरुंची हीच मंगल कामना असते, की प्रत्येक श्रद्धाळू भक्त या समागमात प्रेम, आदर आणि योग्य सुविधा अनुभवून आध्यात्मिक रूपाने समृद्ध व्हावा. संत निरंकारी मंडळाचे सचिव श्री. जोगिंदर सुखीजाजी यांच्या मते, “एकेकाळी जे स्थळ केवळ एक सामान्य मैदान होते, ते आज संतांच्या कर्मठ व निःस्वार्थ सेवाभावामुळे भव्य शामियान्यांच्या सुंदर नगरीत रूपांतरित झाले आहे. हे दिव्य वातावरण भेट देणाऱ्या प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करते.”
समागम स्थळाला एक दिव्य नगरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विशाल पंडालांमध्ये भक्तांसाठी सुव्यवस्थित बसण्याची व्यवस्था सुनिश्चित करण्यात आली आहे. समागमाच्या मुख्य मंचावर होणाऱ्या प्रेरणादायी प्रवचन, भावपूर्ण भजन आणि विचार अधिक प्रभावीपणे दर्शवण्यासाठी अत्याधुनिक एल.ई.डी. स्क्रीन संपूर्ण परिसरात बसविण्यात आल्या आहेत, ज्यामुळे दूरवर बसलेले श्रद्धाळूही त्याच भाव, ऊर्जा आणि अनुभूतीने सत्संगाचा लाभ घेऊ शकतील.
संपूर्ण समागम परिसर चार प्रमुख विभागांत विभागलेला असून संचालन, आवागमन आणि सोयींचे योग्य नियोजन सुनिश्चित करण्यात आले आहे.
गतवर्षांच्या परंपरेला पुढे नेत, यंदाही मुंबईच्या श्रद्धाळू भक्तांनी तयार केलेले मुख्य स्वागतद्वार आपल्या कलात्मक भव्यतेसह समागमाच्या आध्यात्मिक रूपरेखेचे प्रतिबिंब म्हणून उदयास येत आहे. हे द्वार केवळ सौंदर्याचे प्रतीक नसून, समर्पण, सेवा आणि सृजनशीलतेचे जिवंत उदाहरण आहे. दरवर्षी वाढणाऱ्या श्रद्धाळूंच्या संख्येसह हे स्वागतद्वारही आपल्या स्वरूप, विस्तार आणि गौरव यात अधिकाधिक भव्य होत चालले आहे, जणू ते संपूर्ण मानवतेला प्रेम, आपुलकी आणि समभावाने आमंत्रित करण्यास तत्पर आहे.
या पवित्र संत समागमात सर्व सज्जनांचे आणि श्रद्धाळू भक्तांचे मनःपूर्वक स्वागत आहे. चला, या आत्मिक मिलन आणि भक्तीच्या महासंगमाचा भाग बनूया, सतगुरुंचे दिव्य दर्शन प्राप्त करूया, त्यांच्या अमृतमय प्रवचनांचा लाभ घेऊया आणि आत्म्याला परमात्म्याशी जोडणाऱ्या या अद्वितीय प्रवासात सहभागी होऊन जीवनाला धन्य करूया. निःसंशयपणे, हा संत समागम केवळ एक आयोजन नसून आत्ममंथन, आत्मबोध आणि अंतरिक शुद्धी करण्याची एक सुवर्ण संधी आहे.


















