जालना : नाताळनिमित्त टॉम डॉप्सन मेमोरियल चर्च संडे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ख्रिस्त जन्म नाटिकेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रभू येशूंच्या जन्माच्या घटनेवर आधारित लहानग्यांनी सादर केलेली ही नाटिका भावस्पर्शी ठरली.
नाटिकेमध्ये अवघ्या तीन महिन्यांच्या जोशवा कांबळे यांनी येशू बाळाची भूमिका साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. माता मरियमची भूमिका एस्तेर लोखंडे यांनी, तर योसेफची भूमिका नयन गुढेकर यांनी प्रभावीपणे साकारली. तसेच समृद्धी लाखे, रिया लोखंडे, जिया कांबळे, जॉनथन लोखंडे, प्रणाली ससाने, शार्लेट कांबळे, सिया कांबळे, आदित्य लोखंडे, अदिती लोखंडे, कृपा गायकवाड, सॅन्वी गायकवाड, सुमित मरसाळे, तन्मय कांबळे, हर्ष भंडारे, हर्षल लोखंडे आदी चिमुकल्यांनी नाटिकेत विविध पात्रे साकारली. संडे स्कूलच्या चिमुकल्यांच्या अभिनयामुळे नाटिकेला विशेष जिवंतपणा आला.
ही नाटिका रेव्ह. बि. बी. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शुभाली कांबळे, जॉर्ज उगले व सुहास कांबळे यांनी उत्कृष्टरीत्या बसविली.
यावेळी बायबलवर आधारित बायबल क्विझ स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी प्रभू येशूंच्या जीवनावर आधारित चित्रपट टॉम डॉप्सन मेमोरियल चर्चमध्ये भक्तीमय वातावरणात दाखविण्यात आला.
कार्यक्रमास ख्रिश्चन समाजातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी मॅरेथॉन स्पर्धा, धार्मिक गीतांवर आधारित नृत्य स्पर्धा आदी उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेव्ह. बि. बी. कांबळे, जॉर्ज उगले तसेच टॉम डॉप्सन मेमोरियल चर्च तरुण मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

























