सोलापूर – शहरात पोलिस असल्याची बतावणी करून दोन वयोवृध्द महिलांजवळील एकुण सहाताेळे सोने दागिने घेवून चोरटे लंपास झाले आहेत. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही, दोन घटनेमुळे फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही घटना पंधरा मिनिटांच्या अंतराने घडलेल्या आहेत.
शुक्रवार पेठ,अजोबा गणपती समोर असलेल्या एका घराशेजारी वयोवृध्द महिला सकाळच्या कोवळ्या ऊन्हात बसल्या होत्या, त्यावेळी त्याच्याजवळ दुचाकीवरून दोघेजण आले,त्यांनी आम्ही पोलिस असल्याची बतावणी केली, बाहेर दागिने घालून बसू नका, चोरे फिरत आहेत, दागिने काढायला लावून अज्ञात दोघांनी वयोवृध्द महिलेचे साडे चार तोळे सोने लंपास केले. ही घटना रविवारी सकाळी आठ वाजता वर्दळ सुरु असताना घडली,हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिसांत झाली असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु आहे.
याबाबत किरण विजयकुमार वनारोटे (वय ७८ रा.४८६ शुक्रवार पेठ, अजोबा गणपती समोर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलिसांत अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण वनारोटे यांना मागील आठ दिवसापासून डॉक्टरांनी सकाळच्या कोवळ्या उन्हात बसवण्याचा सल्ला होत्या. त्यानुसार त्या सकाळी उन्हात बसत होत्या. रविवारही त्या दैनंदिन प्रमाणे सकाळी आठच्या सुमारास घरासमोर खुर्ची टाकुन बसल्या होत्या. त्यावेळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून दोघेजण आले,त्या वयोवृध्द महिलेजवळ थांबले, दुचाकीवरून खाली उतरून वयोवृध्द महिलेजवळ गेले, आम्ही साध्या वेशातील पोलिस आहोत. बाहेर चोरं फिरायला लागली आहेत. बाहेर दागिने घालून बसायला परवानगी नाही. दागिने काढा अन्यथा महिला पोलिस कर्मचारी बोलवू असे म्हणून वयोवृध्द महिलेस अडीच तोळ्याच्या पाटल्या व दोन तोळे वजनाचे सोन्याचे बिलवर असा एकुण साडे चार लाख रुपयांचे काढून घेतले, लगेच दुचाकीवरून पळून गेले, त्यावेळी वयोवृध्द महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याचा चोर …चोर म्हणत पाठलाग केला, परंतु ते दोघेजण दुचाकीवरून पसार झाले होते. त्यावेळी घटना पाहणाऱ्या वयोवृध्द महिलेच्या सून महानंद यांनी ही चोर चोर म्हणाल्या तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. या प्रकरणाचा तपास सहा पोलिस निरीक्षक अजित पाटील हे करीत आहेत.
पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ महिलेचे सव्वा तोळे सोने हात चलाखीने लंपास केले याप्रकरणी अज्ञात दोन जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना रविवारी सकाळी आठ च्या सुमारास गडदर्शन बगीचाच्या कोपऱ्यावर दमानी नगर येथे घडली आहे. याबाबत मीनाक्षी पंडीत लेंडवे (वय ६० रा. अंबराई देशमुख पाटील वस्ती, दमानी नगरच्या बाजूला)यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गडदर्शन बगीचा च्या कोपऱ्यावर मीनाक्षी लेंडवे बसल्या होत्या. दोन अज्ञात व्यक्ती त्याच्याजवळ आले, त्यांनी महिलेस पोलिस असल्याची बतावणी केली, त्याच्या कानातील चार ग्रॅमची कर्णफुले,व एक तोळ्याचे मंगळसूत्र असा ९८ हजाराचा ऐवज काढण्यास सांगून हात चलाखीने घेवून फसवणूक केली आहे.”




















