मुंबई – राज्यात पुढील दोन ते तीन वर्षांत 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी बी-बियाणे उत्पादक कंपन्यानी नैसर्गिक शेतीस अनुरूप वाणांची निर्मिती करणे ही मागणी आहे. बी बियाणे उत्पादक कंपन्यांनी नवकल्पना दिल्यास आपण शाश्वततेकडे जाऊ शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला.
आशियाई बी-बियाणे परिषद-2025 चे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, आशिया पॅसिफिक सीड असोसिएशनचे अध्यक्ष टेकवोंग; नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. एम. प्रभाकर राव, फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्री ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय राणा, आशिया पॅसिफिक सीड असोसिएशनचे कार्यकारी संचालक फ्रँकलिन सिओ, नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडियाचे कोषाध्यक्ष वैभव काशीकर आणि फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्री ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष राजू राठी तसेच विविध देशांतील प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारताची बी-बियाणे बाजारपेठ ही जगातील वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे. आज ती सुमारे 7.8 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली असून 2030 पर्यंत जवळपास 19 अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. अमेरिका, चीन, फ्रान्स आणि ब्राझीलनंतर भारत जगात पाचव्या क्रमांकावर आहे आणि भारतात वापरल्या जाणाऱ्या 95 टक्के पेक्षा जास्त बियाण्यांचे उत्पादन देशांतर्गत होत असल्याने हा उद्योग थेट ‘मेक इन इंडिया’ला हातभार लावत आहे.
हवामान बदलाचा शेतीवर गंभीर परिणाम होत आहेत., आता लवचिक, हवामान-प्रतिरोधक वाणांची गरज अधिक वाढली आहे. शाश्वत शेतीसाठी रासायनिक निविष्ठांचा वापर कमी करणे आणि नवकल्पक बियाण्यांकडे वाटचाल करणे अत्यावश्यक आहे,असे सांगून ते म्हणाले,, बी-बियाणे उद्योगातील पारदर्शकता वाढवण्यासाठी शासन महत्वपूर्ण पावले उचलत आहे. अनिवार्य प्रमाणन, डिजिटल शोधक्षमता, सुव्यवस्थित नोंदणी आणि बनावट बियाणे रोखण्यासाठी कठोर दंडात्मक तरतुदी असे अनेक सुधारात्मक उपाय राबवले जात आहेत. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर बी-बियाणे पुरवठा व्यवस्थापनात अत्यावश्यक ठरणार आहे.
महाराष्ट्राने देशातील पहिले ‘महा कृषी एआय धोरण’ तयार केले असून 500 कोटी रुपयांच्या प्रारंभिक निधीसह एआय-आधारित कृषी आराखडा विकसित केला आहे.असे सांगून ते म्हणाले,’ अॅग्री स्टॅक, महावेध आणि क्रॉपसॅप या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आपल्याकडे प्रचंड प्रमाणात कृषी डेटाबेस उपलब्ध आहे. या डेटाचा उपयोग करून शेती अधिक विज्ञाननिष्ठ, पूर्वानुमानक्षम आणि उत्पादनक्षम होऊ शकते, .पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी महाराष्ट्रात देशी वाण आणि देशी बियाणे जपली असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि शेती अधिक शाश्वत बनवणे हे आपले सामायिक ध्येय आहे. शासन व बी बियाणे उद्योगाने हातात हात घालून काम केल्यासच शेतीचे भविष्य सुरक्षित राहील.
पुढील अधिवेशनात नवीन बी बियाणे कायदा आणला जाणार : केंद्रीय कृषीमंत्री
निकृष्ट व अनधिकृत बियाणे विक्रीवर नियंत्रणासाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन बी-बियाणे कायदा आणण्यात येणार असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.ते म्हणाले की,’ शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण बीज उपलब्धतेची गरज असून बी बियाणे उद्योगाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा, असे आवाहन केले. डाळी व तेलबिया उत्पादनात खासगी क्षेत्राचे योगदान कमी असल्याने आयातीवरील अवलंबित्व वाढल्याचे सांगत त्यांनी बी बियाणे कंपन्यांनी या क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही नमूद केले.
———-


















