सोलापूर – वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील प्रा. दिनकर आर. पटनायक (पटनायाकुनी) यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथून विद्यावाचस्पती पदवी (पीएच.डी.) संपादन केली आहे.
प्रा. पटनायक यांनी “डेव्हलपमेंट ऑफ इव्हेंट-बेस्ड हार्डवेअर-इन-द-लूप फ्रेमवर्क फॉर इंटरनेट ऑफ थिंग्ज ॲप्लिकेशन्स” या अत्याधुनिक विषयावर संशोधन केले आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज क्षेत्रातील विविध उपयोजनांसाठी इव्हेंट-आधारित हार्डवेअर-इन-द-लूप आराखडा विकसित करण्याच्या या संशोधनामुळे औद्योगिक प्रणाली, स्मार्ट प्रणाली आणि तात्काळ प्रतिसाद देणाऱ्या एम्बेडेड तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान अपेक्षित आहे.
डब्ल्यू.आय.टी.चे इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. सचिन गेंगेज यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. बाह्य परीक्षक म्हणून पुणे येथील भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डॉ. अरुंधती शिंदे आणि मध्यप्रदेशातील इंदूरच्या महू येथील मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंगचे प्रा. डॉ. राजेश बोदाडे यांनी प्रबंध परीक्षण केले. विज्ञान व तंत्रज्ञान अधिविभागांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी शाखेतील हे संशोधन विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेला अधोरेखित करणारे ठरले आहे. औद्योगिक क्षेत्राशी सुसंगत आणि आधुनिक तांत्रिक गरजांना प्रतिसाद देणारे हे संशोधन सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद मानले जात आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, विश्वस्त भूषण शहा, वैभव गांधी, पराग शहा व समस्त विश्वस्त, प्राचार्य डॉ. विजय आठवले, विभागप्रमुख डॉ. आशा थळंगे तसेच प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रा. दिनकर आर. पटनायक यांचे अभिनंदन केले. त्यांच्या संशोधनामुळे तंत्रज्ञानाधारित सुरक्षित व कार्यक्षम प्रणालींच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.






















