पंढरपूर – राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीच्या तीरावर असलेल्या पूर रेषेच्या तसेच ज्या भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पुराचे पाणी साठत आहे. अशा सखल भागात नवीन बांधकाम करण्यास परवानगी न देण्याचा निर्णय नगर विकास विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या गोविंदपुरा, हरिदास वेस, भजनदास चौक, घोंगडे गल्ली, जुनी पेठ, संत पेठ प्रदक्षणा मार्ग , केंद्रेकर महाराज मठ आदी भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे या भागातील नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. या भागामध्ये अनेक जुने वाडे, जुन्या बिल्डिंग, मठ आहेत त्याची बांधकाम दुरुस्ती करण्याची प्रक्रिया नागरिकांकडून सुरूच असते. परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या भागातील अनेक घरांना धोका निर्माण झालेला असतो त्यामुळे कालांतराने या भागातील बांधकामे नव्याने करावी लागतात. मात्र शासनाच्या या निर्णयामुळे या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.
उजनी धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आल्यानंतर उजनीतून भीमा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सोडण्यात येतो. त्यामुळे पंढरपूरला पूर जन्य परिस्थिती निर्माण होते. नदीपात्राच्या लगत असलेल्या भागांमध्ये पुराचे पाणी येऊन या भागातील अनेक घरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते. यामुळे जनजीवन विस्कळीत होते. पुरामुळे अनेक घरांची पडझड होत असते. पुराचे पाणी मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये साचल्यामुळे घराचे भिंतीची, मोठे नुकसान देखील होते. त्यामुळे या भागातील नागरिकांना त्यांच्या घराची वेळोवेळी दुरुस्ती करणे गरजेचे असते. मात्र पूररेषेच्या आत असलेल्या निवासी ठिकाणी संबंधित भागांमध्ये नवीन बांधकाम करण्यास परवानगी न देण्याचा निर्णय नगर विकास विभागाच्या वतीने घेण्यात आलेला आहे.
याबाबत नगरसेवक विक्रम शिरसट यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाला यावर योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत विनंती केली आहे. मुख्याधिकारी महेश रोकडे यांची भेट घेऊन नगरसेवक शिरसट व वाळूजकर यांनी यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. पंढरपूर शहरातील प्रदर्शना मार्ग, संत पेठ, गोविंदपुरा, हरिदास वेस, भजनदास चौक, हा परिसर पूर रेषेच्या आत मध्ये येतो. भीमा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येते. त्यामुळे या ठिकाणी नवीन बांधकाम परवानगी देण्यास नगर विकास विभागाच्या वतीने प्रतिबंध करण्यात आला आहे.
यावेळी शिरसट म्हणाले की या भागामध्ये अनेक जुन्या इमारती आहेत तर अनेक मठ देखील आहेत त्यांची देखभाल दुरुस्ती व बांधकाम होणे गरजेचे आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये अनेकांनी बांधकाम परवानगी करिता नगरपालिका प्रशासनाकडे अर्ज करून देखील नगरपालिका प्रशासनाच्या वतीने पंढरपूर शहरातील वरील भागातील सुमारे दोनशे नागरिकांच्या बांधकामांच्या फाईली धुळखात पडून आहेत.
यामुळे या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन यावर तोडगा काढावा. व या भागातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी यावेळी मा. नगरसेवक विक्रम शिरसट, नगरसेवक सुनील वाळूजकर, नगरसेवक लक्ष्मण शिरसट यांनी मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याकडे केली आहे.
























