माढा : माढा तालुक्यातील चार सुपुत्रांची एकाच वेळी तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे तालुक्यासाठी ही बाब अभिमानाची आहे.
शासनाच्या वतीने नुकतेच तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली असून, माढा तालुक्यासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे. कारण, एकाचवेळी तालुक्यातील चार सुपुत्रांना पदोन्नती मिळत उपजिल्हाधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे.
यामध्ये वेताळवाडीचे सुपुत्र तथा हवेली येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले किरण सुरवसे यांची पदोन्नतीने सोलापूर येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. ते २००४ साली नायब तहसीलदार म्हणून प्रशासनात रूजू झाले होते. त्यांनी आतापर्यंत रायगड, ठाणे व पुणे जिल्ह्यात सेवा बजावली आहे. तर दारफळ सिना येथील सुपूत्र प्रदीप उबाळे, जे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार म्हणून कार्यरत होते, त्यांची नागपूर येथे भूसंपादन उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते २०१४ साली राज्यसेवेतून तहसीलदार म्हणून उत्तीर्ण झाले होते.
बारामती येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले निमगाव (टे) चे सुपुत्र गणेश शिंदे यांची पदोन्नतीने धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे प्रांतधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांनी २००७ साली राज्यसेवेत नायब तहसीलदार म्हणून प्रवेश केला होता आणि विदर्भ, सांगली, बारामती या ठिकाणी उल्लेखनीय सेवा बजावली आहे.
तर लऊळ गावाचे सुपुत्र तथा गगनबावडा येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले बट्टू उर्फ गणेश गोरे यांची पालघर येथे निवडणूक उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते २००३ साली नायब तहसीलदार म्हणून सेवेत रुजू झाले होते.


















