पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रेजीनगर भागात बुधवारी दंगल उसळली. रामनवमीच्या शोभायात्रेवर दगडफेक केल्यानंतर उसळलेल्या दंगलीत 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
रामनवमीपूर्वीच्या प्रत्येक जाहीर सभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दंगलीची भीती वारंवार व्यक्त केली होती. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर अखेर हा प्रकार घडला. याबाबत भाजपचे ज्येष्ठ आमदार आणि विरोधी पक्षनेते सुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली असून, त्यांच्या चिथावणीमुळेच ही दंगल घडल्याचे म्हटले आहे. यात पोलिसांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला आणि पोलिसांनी मिरवणुकीवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. एकीकडे दंगलखोर दगडफेक करत होते आणि दुसरीकडे पोलीस रामभक्तांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत होते. बंगालमध्ये सण शांततेत साजरे करण्यासाठी येथे भाजपचे सरकार येणे अत्यंत अवश्यक असल्याचे शुभेंजू अधिकारी यांनी म्हंटले आहे. याप्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रेजीनगरमधील हिंदू अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर बंगाल भाजपचे प्रभारी अमित मालवीय यांनी आज, गुरुवारी ट्विटरवर लिहिले की, बंगाल तुटत आहे आणि त्याला ममता बॅनर्जी जबाबदार आहेत. त्यांच्या निंदनीय आणि जातीयवादी भाषणांमुळे संपूर्ण बंगालमध्ये रामभक्तांवर हल्ले झाले आहेत. मुर्शिदाबादमध्ये मोठ्या दंगलीनंतर बंगाली हिंदूंचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल मेदिनीपूरमध्ये श्री राम भक्तांवर झालेल्या क्रूर हल्ल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते आज एगरा पोलिस ठाण्याला घेराव घालेल असे मालवीय यांनी सांगितले.