रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी पक्षाच्या तेराव्या यादीनुसार श्री. राणे यांना उमेदवारी जाहीर केल्याचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा बहुप्रतीक्षित तिढा अखेर सुटला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरीचे विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्याविरुद्ध नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार असतील. शिवसेना नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन किरण सामंत यांची उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. त्याचवेळी भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते. भाजपने उदयनराजे भोसले, पियुष गोयल यांच्यापाठोपाठ महाराष्ट्रातून आणखी एका राज्यसभा खासदाराला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस जवळ आला असतानाही हा तिढा सुटलेला नव्हता. भाजपकडून नारायण राणे यांचे एकमेव नाव चर्चेत होते. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या रत्नागिरी मतदारसंघावर अखेर भाजपने झेंडा रोवत राणेंना मैदानात उतरवले आहे.