सोलापूर – रघुनाथ क्षीरसागर लिखित फोटो फ्रेम या कौटुंबिक कथा संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक अरविंद जोशी यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखिका सुनेत्रा पंडित यांच्या उपस्थितीत झाले.
सुरुवातीस सरस्वती पूजन वंदनानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
जटायू अक्षर सेवेचे प्रतिनिधी सुमित गाडेकर यांनी राष्ट्रीय विचार देणाऱ्या जटायू अक्षर सेवा या संस्थेची माहिती व परिचय करून दिला.
फोटो फ्रेम या कथेचे वाचन श्री वरदराज मिरजी व अर्चना कुलकर्णी यांनी केले.
रघुनाथ क्षीरसागर यांनी आपला वाचन व लेखन प्रवास उघडून सांगताना ही प्रेरणा आपल्याला आजी व वडील यांच्याकडून मिळाली असे सांगितले तसेच रहस्यकथा लेखनानंतर सामाजिक विचार देणाऱ्या कौटुंबिक कथा लिहिण्यास प्रारंभ केला असे सांगितले.
विवाह प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा संस्कार असून त्यात काळानुरूप बदल होत चालले आहेत. मात्र आपली संस्कृती आपण जपली पाहिजे असे सुनेत्रा पंडित यांनी सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये श्री अरविंद जोशी यांनी नातलगांमधील भाव संबंध व विवाह व्यवस्था याचा जागतिक संदर्भ देऊन मागोवा घेतला तसेच बदलत्या काळात आपले नातेसंबंध दृढ कसे होतील व विवाह व्यवस्था कशी चांगली राहील याविषयी सर्वांनी विचार करावा असे सांगितले.
अभिरुची साहित्यालय (लायब्ररी) या संस्थेतर्फे तीस वर्षांपूर्वीच्या मान्यवर वाचक सभासदांचा सत्कार करण्यात आला.
सौ अदिती मुळे (क्षीरसागर) यांनी उपस्थित रसिकांचे आभार मानले.
सूत्रसंचालन प्रिसिजन वाचक दूत श्री श्रीधर खेडगीकर यांनी अतिशय सुंदररित्या केले.
मायबोली दिनाचे औचित्य साधून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास समाजातील विविध क्षेत्रातील रसिक, मान्यवर , व वाचक उपस्थित होते.


























